Booster Dose: फुकटच्या ‘बूस्टर’ची सुई आवडे सर्वांना; मोफत झाल्यापासून डाेस घेणाऱ्यांमध्ये तिपटीने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 10:43 AM2022-08-02T10:43:18+5:302022-08-02T10:43:30+5:30
शहरात १६ दिवसांत ८० हजार जणांना माेफत बूस्टर डाेस
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलैपासून पुढील ७५ दिवस १८ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. शहरात १५ जुलैपासून आतापर्यंत १८ ते ५९ वयाेगटात ७९ हजार ९६८ जणांनी माेफत बूस्टर डाेसचा लाभ घेतला आहे. याआधी हा बूस्टर डाेस खासगीमध्ये विकत घ्यावा लागत असल्याने त्याचे प्रमाण फार कमी हाेते.
याआधी म्हणजेच १५ जुलैआधी बूस्टर डाेस हा हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ६० वर्षांच्या पुढील नागरिक वगळता ताे इतरांना विकत घ्यावा लागत हाेता. ताे खासगी रुग्णालयांत ३८५ रुपये भरून घ्यावा लागत हाेता. त्यामुळे त्याला प्रतिसाद नव्हता. याआधी शहरात खासगी रुग्णालयात १८ ते ५९ वयाेगटात दरदिवशी केवळ दीड ते दाेन हजार लाभार्थी लस घेत असत. मात्र, आता ती संख्या दरदिवसाकाठी ५ ते सात हजारांवर गेली असून त्यामध्ये तिप्पटीने वाढ झाली आहे.
शहरातील ६८ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, सध्या डाेसची कमतरता असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे. शहरात आतापर्यंत सर्व वयाेगटातील ३८ लाख ७८ हजार नागरिकांनी पहिला डोस, तर ३२ लाख ५१ हजार जणांनी दुसरा डाेस घेतला आहे.
१८ वर्षांपुढील नागरिकांचा लसीकरणाचा अहवाल :-
१८ वर्षांपुढील नागरिकांची लोकसंख्या : ४२ लाख १० हजार ५९२
पात्र लाभार्थी : ३लाख ३० हजार ३३४
पहिला डोस पूर्ण : ३७ लाख ७८ हजार
दुसरा डोस झालेले लाभार्थी : ३२ लाख ५१ हजार
तिसरा डोस : ४ लाख ५५ हजार
''दुसरा डोस घेऊन ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस घेता येणार आहे. नागरिकांनी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. महापालिकेकडे काेव्हॅक्सिन लसीचा सध्या तुटवडा आहे. मात्र, ताे लवकरच दूर हाेईल. - डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका.''