कोविड सेंटर साठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे : सुजाता पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:49+5:302021-04-28T04:12:49+5:30
शिरूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ येथील कोविड सेंटर अपुरे पडू लागल्याने वढू बुद्रुकचे ...
शिरूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ येथील कोविड सेंटर अपुरे पडू लागल्याने वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे पिंपळे जगताप येथे कोविड सेंटर सुरू व्हावे, अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर उद्योजक गणेश शेळके यांनी चौफुला येथील मयुरी लॉन्स मंगल कार्यालय येथे २०० बेडचे कोविड सेंटर उभारणीचा निर्णय घेतला. सुजाता पवार यांनी भेट देत पाहणी केली आहे. यावेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, तालुका आरोग्य अधिकारी दामोदर मोरे आदींसह प्रफुल्ल शिवले यांनी तयार करत असलेल्या कोविड सेंटर ची पाहणी केली.
यावेळी बोलताना चौफुला येथील सदर कोविड सेंटर मध्ये रुग्णांना सुसज्ज सुविधा देण्यात येणार आहेत. मात्र कोविड सेंटरच्या मदतीसाठी सर्व नागरिक, पदाधिकारी यांनी योगदान देणे गरजेचे आहे तसेच सामाजिक संस्थांनी देखील कोविड सेंटरच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे देखील सुजाता पवार यांनी सांगितले.
रुग्णांना कोणतीही सुविधा कमी पडू देणार नाही
सध्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना ऑक्सीजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन याचा तुटवडा भासत आहे. परिसरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाणी तालुक्याचे आमदार ॲड. अशोक पवार व सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौफुला येथे होणाऱ्या कोविड सेंटर मध्ये कोरोना रुग्णांसाठी सर्वोत्तम सुविधा निर्माण करणार असल्याचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले.
चौफुला (ता. शिरूर) येथे कोविड सेंटर सुरु होणाऱ्या ठिकाणी भेट देत पाहणी करताना सुजाता पवार, सभापती मोनिका हरगुडे व सरपंच प्रफुल्ल शिवले