दुर्गसंवर्धनाच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हा : युवराज जेधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:34+5:302021-03-05T04:10:34+5:30
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील किल्ले दौलतमंगळ येथे किल्ले दौलत मंगळ दुर्गसंवर्धन समितीच्या वतीने आयोजित दुर्ग पूजेदरम्यान ते ...
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील किल्ले दौलतमंगळ येथे किल्ले दौलत मंगळ दुर्गसंवर्धन समितीच्या वतीने आयोजित दुर्ग पूजेदरम्यान ते बोलत होते.
गेल्या २४ वर्षांपासून शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गडकिल्ल्यावर दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुर्गपूजा केली जाते. यामुळे किल्ले दौलतमंगळ येथे दुर्गसंवर्धन परिवाराच्या वतीने दुर्गपूजा करण्यात आली. यावेळी सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, राजश्री कान्होजी नाईक जेधे यांचे वंशज युवराज जेधे, वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज नीलेश देशपांडे, संदेश देशपांडे, सिनेअभिनेते सचिन गवळी यांच्या हस्ते गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याचे पूजन करून दुर्ग पूजा करण्यात आली. यावेळी शिवभक्त सचिन गवळी यांनी केलेल्या शिवगर्जनेने किल्ले दौलतमंगळचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिवव्याख्याते तेजस टेंगले, युवराज राठोड, सह्याद्री फाउंडेशनचे प्रमोद उबाळे, किल्ले दौलत मंगळ दुर्गसंवर्धन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनय गुरव, उपाध्यक्ष संजय यादव, कार्याध्यक्ष प्रवीण कामठे, दिगंबर यादव, अक्षय यादव, सिद्धार्थ गद्रे, राजाभाऊ भुसनर सर्व सदस्य उपस्थित होते. दुर्गपूजेनंतर भुलेश्वर महादेवाच्या मंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षक सहायक पुणे मंडळाचे संरक्षक सहायक गजानन मंडावरे यांच्यासोबत चर्चा करून किल्ले दौलतमंगळच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा केली. किल्ले दौलतमंगळच्या दुर्गसंवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन यावेळी गजानन मंडावरे यांनी दिले.
फोटोओळ - माळशिरस (ता. पुरंदर) येथे किल्ले दौलतमंगळ येथे दुर्गपूजा करताना मान्यवर.