गावाच्या विकासासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:15 AM2021-02-21T04:15:29+5:302021-02-21T04:15:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव ढमढेरे : आमचा गाव, आमचा विकास आराखडा राबवताना गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग गावच्या विकासाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव ढमढेरे : आमचा गाव, आमचा विकास आराखडा राबवताना गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग गावच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अजित साकोरे यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात जिल्हा परिषद व शिरूर पंचायत समितीच्या वतीने आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत गणस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी साकोरे बोलत होते. या कार्यशाळेसाठी तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, दरेकरवाडी, धानोरे, डिंग्रजवाडी, टाकळी भीमा या सहा गावांतील ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्राम संसाधन गटाचे सदस्य यासह ग्रामसेवक दादासाहेब नाथ, सदानंद फडतरे, आरती गोसावी, विमल आव्हाड आदी उपस्थित होते.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे, आरती भुजबळ, ॲड. सुरेश भुजबळ, बचत गटाच्या चेतना ढमढेरे या सर्वांनी मनोगत व्यक्य केले. प्रत्यक्ष आराखडा तयार करण्यापूर्वी वंचित घटकाची सभा, बाल सभा व महिला सभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच गावच्या ग्रामसभेत आमचा गाव, आमचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतरच विविध निधीच्या माध्यमातून प्रत्यक्ष गावच्या विकासकामांना प्रारंभ होणार आहे. ग्रामपंचायतीचा स्वनिधी, १५ वा वित्तआयोग, मनरेगा, स्वच्छ भारत अभियान इतर बक्षिसे या निधीअंतर्गत हा विकास आराखडा बनवताना ५० टक्के बंधीतनिधी व ५० टक्के अबंधीत निधी याप्रमाणे आमचा गाव, आमचा विकास आराखडा याचे नियोजन करायचे आहे. बंधीत निधीअंतर्गत आरोग्य, पाणीपुरवठा व इतर खर्च करणे तर बंधीत निधीअंतर्गत १० टक्के निधी प्रशासकीय खर्च व उर्वरित विकास कामांवर खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. असे ग्रामसेवक दादासाहेब नाथ यांनी सांगितले.
फोटो ओळ: तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथे आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विस्तार अधिकारी अजित साकोरे.