सगळं होत्याचं नव्हतं झालं, आता उभं कसं रहायचं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:19+5:302021-03-28T04:10:19+5:30
पुणे : ५५ वर्षांचे कय्युम कुरेशी सकाळपासून आपल्या जळून खाक झालेल्या दुकानात दर थोड्या वेळाने जात काही हाताशी लागते ...
पुणे : ५५ वर्षांचे कय्युम कुरेशी सकाळपासून आपल्या जळून खाक झालेल्या दुकानात दर थोड्या वेळाने जात काही हाताशी लागते का बघत आहेत. गेली १५ वर्ष ते इथल्या दुकानांत काम करत आहेत. कोरोना टाळेबंदीतून आत्ता कुठे त्यांचा धंदा सावरत होता. शनिवार, रविवारच्या सुट्या आणि सणवार लक्षात घेऊन त्यांनी जास्तीचे सामान खरेदी करून ठेवले होते. घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल अशा अपेक्षेने ते या शनिवार-रविवारची वाट पाहात होते. पण तो शनिवार त्यांच्या उरलेल्या आशा आणि अपेक्षा धुळीला मिळवून गेला. रात्री दुकानाला आग लागली आणि सगळेच होत्याचे नव्हते झाले.
कुरेशी म्हणाले, “आमचे काहीच वाचले नाहीये. नव्याने टी-शर्ट आणले होते. आत्ता कुठे आम्ही सावरत होतो. कालच आम्ही लॉकडाऊन लागला तर काय याची भीती व्यक्त केली. होणाऱ्या नुकसानाची भीती खरी ठरली पण ती आगीमुळे. सगळेच गेले. आता उभे कसे राहायचे माहीत नाही.”
कुरेशींसारखीच अवस्था इथल्या जवळपास प्रत्येकाची आहे. दुकानातल्या मालाचे जळालेले तुकडेच आता इथे दुकान होते याची साक्ष सांगताहेत. दुसरे एक व्यापारी म्हणाले, “माझे बेल्टच दुकान आहे. त्याचे आता तुकडेच शिल्लक राहिले आहेत. आठ महिने आमचा काम धंदा बंद होता. आता रमजानमध्ये धंदा होईल म्हणून माल भरला होता. पण आता सगळेच गेले. सरकारने आता या सगळ्या परिस्थीतीकडे बघून काय? चूक काय? बरोबर या वादात न पडता सरळ आम्हाला पुन्हा इथे दुकान चालू करायला मदत करायला हवी. अनेक घर-संसार यावर अवलंबून आहेत.” स्वप्नांची राखरांगोळी झाल्यानंतर येथील अनेकांपुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढे काय?