सिंचन घोटाळ्याचे सर्व पुरावे दिलेत, मेगा भरती बंद; मुख्यमंत्र्यांचा पुण्यात सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:03 AM2019-09-15T11:03:48+5:302019-09-15T11:44:01+5:30
शनिवारी सायंकाळी उशिरा पुण्यात भाजपाची महाजनादेश यात्रा पोहोचली होती. यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला.
पुणे : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल रात्री पुण्यात पोहोचली. यावेळी वाहतूक कोंडी झाल्याने पुणेकरांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माफी मागितली. तसेच यात्रेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शनिवारी सायंकाळी उशिरा पुण्यात भाजपाचीमहाजनादेश यात्रा पोहोचली होती. यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. आज सकाळी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. देशात मोदी आणि राज्यात आमच्या सरकारने केलेल्या कामाबद्दल लोक समाधान व्यक्त करत आहेत. पुण्यात प्रवेश केल्यावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. उशिरा प्रवेश केल्याने गैरसोय झाली त्याबद्दल पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो, अशी सुरूवात केली.
पुणे विमानतळाचे विस्तारीकरण करत आहोत. नवीन एअरपोर्टसाठी जमीन अधिग्रहण चालू आहे. मेट्रो, रिंगरोड, इलेक्टरीक बसेस आल्या आहेत. एमसीईआरटी प्रकल्प, नदीसुधार प्रकल्प असे पुण्यात 40 ते 45 हजार कोटींचे प्रकल्प राबवत आहोत. गेल्या 5 वर्षात देशात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली. सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रातच निर्माण झाला. बंद पडलेले प्रकल्प मार्गी लावले. यामुळे जनतेचा विश्वास आपल्याला मिळत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
सिंचन घोटाळ्याचा तपास पूर्णत्वाला गेला असून, आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. पुढच्या 5 वर्षांत दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यावर भर दिला जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
होर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही
उदयनराजे भाजपात आलेल्याचा आनंदच आहे. ते पुन्हा लोकसभेला निवडून जातील. मोठ मोठे नेते भाजपात येत आहेत, हे चांगलेच लक्षण आहे. विधानसभेला अभूतपूर्व विजय मिळवू. बॅनरबाजी करणं अत्यंत चुकीचं आहे. नेत्यांना सूचना आहे की, अशा प्रकारची होर्डिंगबाजी करू नये. होर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही. पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला.