उजनीत प्रदूषित पाणी? काळसर पाण्यामुळे चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:14 AM2018-08-31T00:14:17+5:302018-08-31T00:15:11+5:30
विशिष्ट प्रकारचा वास : काळसर पाण्यामुळे चिंता
पळसदेव : पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्णातील शेतकरी, उद्योग, यांची तहान भागविणारे उजनी धरण १०३ टक्के भरले आहे. उजनी धरणात १८ धरणे व पुणे शहरातील पाणी येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा रंग हिरवट तसेच काळा दिसत आहे. पुणे शहरातून आलेल्या पाण्यामध्ये प्लॅस्टिक, पिशव्या, घनकचरा, इतर घाणीच्या वस्तू वाहून आल्या आहेत. त्यामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्राच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या वस्तूंचा खच साचला आहे.
पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी जेष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन पाहणी करून पाण्याचे नमुने तपासले होते. त्यावेळी हे पाणी पिण्यास तर सोडाच, मात्र हात धुण्यासाठी अथवा शौचालय वापरासाठीसुद्धा योग्य नसल्याचा ‘अभिप्राय’ दिला होता. हेच पाणी मच्छीमार, गुरे राखण करणारे, शेतकरी पित असतात. रोहित (फ्लेमिंगो) पक्षांचे वास्तव्य अधिक या ठिकाणी असते. उजनी धरण भरले असल्याने पक्ष्यांनी या ठिकाणी येण्यास सुरुवात केली आहे.
गेली कित्येक वर्षांपासून उजनीच्या जलप्रदूषणचा विषय गाजत आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. वास्तविक पाहता, उजनीचे पाणी पिण्यास घातक असल्याचा दावा अनेक जलतज्ज्ञांनी केला आहे. अनेक ठिकाणी कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा खच साचलेला दिसला. तसेच पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवट तर काही ठिकाणी काळसर होता. वाहून आलेल्या वस्तू शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस खात असल्याने जनावरांना आजार उद्भवत आहेत. मात्र, उजनीच्या या जलप्रदूषाकडे राज्यकर्ते, शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.