पदर ओढून विनयभंग, माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल; अभिजित शिवरकरची धमकी
By विवेक भुसे | Published: September 23, 2023 06:37 PM2023-09-23T18:37:15+5:302023-09-23T18:37:43+5:30
पुन्हा दिसले तर तुमच्यासह भावकीचे मुडदे पाडू...
पुणे : वानवडी येथील जमिनीवर संरक्षक कंपाऊंड घालण्याचे काम करीत असताना जमीन मालक महिलेला अश्लील शिवीगाळ करून साडीचा पदर ओढून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या माजी नगरसेवक मुलासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अभिजित चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड व त्यांच्या पत्नी आणि मुलगा, राजेश खैरालिया (रा. वानवडीगाव), किरण छेत्री व इतर १० जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ४० वर्षांच्या महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनामागील सिटी सर्व्हे नं. ७९०/५३ मध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची व त्यांच्या भावकीची वडिलोपार्जित मिळकत आहे. फिर्यादी या जागेच्या वारस आहेत. त्यांनी जागेची भूमापन अधिकारी यांच्याकडून सरकारी मोजणी केली आहे. त्या ठिकाणी काही महिला व पुरुष कामगार यांच्याकडून कंपाऊंड लावण्याचे काम चालू होते. यावेळी आरोपी यांनी कामगारांना काम करण्यापासून रोखून लोखंडी पिलर काढून टाकले तसेच अभिजित शिवरकर व भास्कर गायकवाड यांनी फिर्यादी यांना ‘आम्ही मालक आहोत’ असे म्हणून अश्लील शिवीगाळ करून त्यांच्या साडीचा पदर ओढून फरपटत नेत जागेच्या बाहेर काढले. पुन्हा या जागेत दिसला तर तुमच्यासह तुमच्या भावकीचे मुडदे पाडू, अशी धमकी दिली.