माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांना हातपाय मोडण्याची धमकी; १७ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 02:41 PM2022-07-20T14:41:58+5:302022-07-20T15:01:32+5:30
१७ जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल....
राजगुरुनगर (पुणे): शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजी पाटील यांचा पुतळा जाळून अश्लिल भाषेत शिवीगाऴ करुन लांडेवाडी येथील घरी जाऊन हात पाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी १७ जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभागप्रमूख अंकुश किसन शेवाळे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजी पाटलांचा फोटो गाढवाच्या चेह-याच्या ठिकाणी लाऊन त्यावर चप्पलने मारुन चपलांचा हार घातला होता. त्यानंतर प्रतिकात्मक फोटोचे दहण केले होते. त्याचबरोबर पाटलांच्या लांडेवाडी येथील घरी जाऊन हात पाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करीत आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे, गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हाण, शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे सर्व (रा. राजगुरुनगर ता खेड ) यांचा समावेश आहे. या शिवसेना कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याने पुणे -नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे एकत्र येऊन आढळराव पाटलांविरोधात आंदोलन केले होते.