Pune: आंबेगाव तालुक्यात भरकार्यक्रमात माजी सरपंचावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 02:32 PM2022-03-27T14:32:51+5:302022-03-27T14:33:11+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगावपीर येथे समाईक बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपावरून झालेल्या भांडणातून केला हल्ला
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगावपीर येथे समाईक बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपावरून झालेल्या भांडणातून माजी सरपंच संजय दिगंबर पोखरकर (वय ४९) यांच्यावर लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी संतोष राजगुडे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहिती या बाबत संजय पोखरकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वडगाव पीर येथे यात्रा उत्सव चालू होता. यात्रा उत्सवा दरम्यान शनिवारी रात्री ११ वाजता मंगला बनसोडे यांचे लोकनाट्य तमाशा सुरू असताना मान्यवरांचा मानसन्मान करण्यासाठी संजय पोखरकर व इतर ग्रामस्थ यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून स्टेजवरून उठून रात्री १ च्या सुमारास पन्नास फूट अंतरापर्यंत चालत गेले. त्यावेळी संतोष कचरू राजगुडे (रा.वडगावपीर) याने पोखरकर यांच्या सामायिक असलेल्या बोरवेलच्या पाण्याच्या वाटपाचा राग मनात धरून पाठीमागून येऊन लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात पोखरकर यांच्या कानाच्या मागे, टाळू व कपाळावर तसेच मनगटावर गंभीर जखमा झाल्या आहे. त्यांच्या सोबत असणारे सावळेराम फकीरा आदक यांच्या हातावर वार लागून जखम झाली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी संतोष कचरू राजगुडे यास पकडून पोखरकर व सावळेराम आदक यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक उमेश चिकणे करत आहेत.