आगीच्या धुरात गुदमरून माजी सरपंचासह पत्नीचा मृत्यू; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 12:35 IST2023-07-15T12:30:52+5:302023-07-15T12:35:02+5:30
गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता...

आगीच्या धुरात गुदमरून माजी सरपंचासह पत्नीचा मृत्यू; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
जुन्नर (पुणे) : आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडी येथील वयोवृद्ध माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहत्या घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. आदर्श सरपंच विजेते मारुती भाऊ साबळे (वय ८३) व त्यांच्या पत्नी पुताबाई मारुती साबळे (वय ७३) अशी त्यांची नावे आहेत.
आपटाळे येथील साबळेवाडी या छोट्या वस्तीत मारुती भाऊ साबळे हे त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता व ते दोघेही झोपले होते. रात्री दिव्याने पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला तसेच घरात आग पसरली.
आग वाढल्याने दोघांनाही जाग आली असता आग विझविण्यासाठी दोघांनीही बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडल्याने श्वास गुदमरून दोघेही जागीच कोसळले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी उशिरा ही घटना उघडकीस आली त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.