भावे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 06:31 PM2019-07-26T18:31:46+5:302019-07-26T18:32:58+5:30
कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
पुणे : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे भारतीय वायू सेनेतील ग्रुप कॅप्टन महाबळेश्वर श्रीनिवास देशपांडे उपस्थित हाेते.
देशपांडे यांनी भारतीय सैनिकांचा जागतिक युद्धातील सहभाग, शौर्य, पराक्रम व देशाप्रती असलेली समर्पणाची भावना याविषयी माहिती सांगितली. इतिहासात याचा उल्लेख नसल्याची खंत व्यक्त केली. निवृत्ती नंतरही सैनिक समाजात मिसळून करत असलेल्या कामाचा आढावा घेत मुलांना भारतीय सैन्य दलात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. तसेच सैनिकांना योग्य सन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
परिस्थितीशी झगडत सैनिकच होणार या ध्येयाने वाटचाल करत २० वर्षे लष्करात सेवा केलेले माजी सैनिक बजरंग निंबाळकर यांनी देश सेवेसाठी सैन्यात जाण्याची आवश्यकता नसून प्रामाणिकपणा, शिस्त, प्रखर राष्ट्रीयत्व, सेवा व इतरांना मदत करण्याची वृत्ती असल्यास आपणही रोज देश सेवाच करतो असे सांगितले. कारगिल युद्धातील स्वतः चे अंगावर शहारे आणणारे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या उपमुख्याद्यापिका सुलभा विधाते तर सूत्रसंचालन लोखंडे यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका नाईक, मुख्याध्यापक रोहिदास भारमळ व पदाधिकारी उपस्थित होते. आभार विद्या शिंदे यांनी मानले