गुुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण; कुख्यात गुंड गजानन मारणे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 03:16 PM2021-02-23T15:16:34+5:302021-02-23T15:17:50+5:30
तळोजा कारागृह ते कोथरुड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ क्लीप व्हायरल करुन पुण्यातील नागरिकांच्या मनामध्ये दहशत बसविली.
पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करुन दहशत निर्माण करणार्या गजानन मारणे व त्याच्या समर्थकावर आणखी एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन मारणे हा गुंड असून त्याच्यावर खुन, गर्दी, मारामारी, खंडणी वगैरेसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. परस्परविरोधी टोळी यद्धातून अनेकांचे खून झालेले आहे. गजा मारणेप्रमाणेच त्याचा विरोधी टोळी प्रमुख बाहेर असून त्यांच्यावर दहशत बसावी व जनतेवर दहशत बसावी, जेणेकरुन त्याच्या दृष्टकृत्यास कोणी आड येणार नाही. म्हणून त्यांचे समर्थकाकरवी जनतेच्या मनामध्ये दहशत रहावी म्हणून कट करुन युट्युब, फेसबुक, इन्स्ट्राग्रामवर अशा माध्यमातून त्यांनी नियोजनपूर्वक तळोजा कारागृह ते कोथरुड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ क्लीप व्हायरल करुन, त्यावर कमेंटपोस्ट करुन व लाईक करुन पुण्यातील नागरिकांच्या मनामध्ये दहशत बसविली. त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होईल असे वातावरण तयार केले.
मारणे याच्याविरुद्ध ७ गुन्हे प्रलंबित आहेत. या प्रलंबित केसमधील साक्षीदार, अन्यायग्रस्त, तक्रारदार यांच्या मनात वाजवी भिती तयार करणे.नागरिकांच्या मनात भीती कायम राहण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केल्याचा पोलिसांचा कयास आहे. मारणे याने सोशल मीडियावर सहकारी व समर्थकांकरवी टाकलेले व्हिडिओ व त्यावरील सोशल मीडियावरील व्यक्त होणारी मते, प्रतिक्रिया गुन्हेगारी स्वरुपाच्या, कायद्याचे अनादर करणाऱ्या बेकायदेशीर प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे असून गुन्हेगारी स्वरुपाच्या, कायद्याचे अनादर करणाऱ्या बेकायदेशीर प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचे सोशल मीडियाचा वापर करुन उदात्तीकरण होत आहे.
गजानन मारणे, त्याची आय टी टीम, नमुद युट्युब, फेसबुक, इन्स्ट्राग्रामचे प्रोफाईलधारक या सर्वाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाप्रकारे जर कोणीही व्यक्ती आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण सोशल मीडियाचा वापर करुन करत असेल, लोकांमध्ये आपली दशहत निर्माण करत असेल व अशा बेकायदेशीर कृत्य करणार्या व्यक्तींना कोणी प्रत्यक्ष किंवा सोशल मिडियामध्ये त्याचे बाजूने कमेंटस करुन प्रोत्साहन देत असेल त्यांच्यावर पुणे शहर पोलीस कडक कायदेशीर कारवाई करतील. व नागरिकांना भयमुक्त वातावरण उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.