परीक्षा रद्दचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:41+5:302021-05-30T04:10:41+5:30
पुणे : राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण ...
पुणे : राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होणार आहे. तसेच दहावीच्या परीक्षेनंतर वाढणा-या आत्मविश्वासला अनेक विद्यार्थी मुकणार आहेत, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. परंतु, या निर्णयाचे अनेक उलटसुलट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार आहेत. ''परीक्षा रद्द झाली तेव्हापासून अभ्यासावरील मन उडाले'', असे कारण सांगत काही विद्यार्थी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न पुढील काळात करताना दिसतील, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्याचे माजी प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे म्हणाले, दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक सामर्थ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करते. तर्क अनुमान, ज्ञान आणि आकलनाला ती सामर्थ्यशाली करते. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व्यक्तिमत्वाला जो भक्कम पायावर आधार मिळायला हवा होता त्यापासून तो वंचित राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कमकुवत होणारा आत्मविश्वास कोरोनानंतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून भक्कम पायावर उभा करावा लागेल.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अडचणी येऊ शकतात. परीक्षा रद्द झाल्याने महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे, ती दूर करता येणार नाही. काही विद्यार्थी पुढील शैक्षणिक जीवनात येणारे अपयश याचे खापर कोरोनामुळे रद्द झालेल्या दहावीच्या परीक्षांवर सोपवणार आहेत. अभ्यासामध्ये मागे असणा-या विद्यार्थ्यांना सवय लागून जाईल की आपण काहीही केले नाही तरी आपण पुढे जातो. ही मानसिकता समाजासाठी घातक आहे.
-----------------
परीक्षा रद्दमुळे विद्यार्थी केवळ एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत गेले आहेत. त्यांना मी कुठे आहे, हे समजण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे शर्यतीत उतरून स्वतःची क्षमता दाखवण्यापासून विद्यार्थी मुकले आहेत. त्याचा निश्चितच त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होईल.
- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य