परीक्षांचा तारखांचा घोळ सुरूच...! यंत्रणा गांभीर्याने कधी विचार करणार? विद्यार्थ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 12:07 PM2022-01-05T12:07:13+5:302022-01-05T12:09:31+5:30
राज्यातील जवळपास २० लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, आरोग्य, म्हाडा, एमआयडीसी तसेच इतरही अनेक विभागातील विविध संवर्गाच्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे.
अभिजित कोळपे
पुणे : राज्यातील जवळपास २० लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, आरोग्य, म्हाडा, एमआयडीसी तसेच इतरही अनेक विभागातील विविध संवर्गाच्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत नवीन पदभरतीची कोणतीही जाहिरात आली नव्हती; मात्र आता मागील दोन-तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षा जाहीर होत आहेत. लाखो विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होऊ लागले होते. विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात देखील केली होती. मात्र, निर्णय घेताना संबंधित यंत्रणा कोणताही विचार न करता वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षा एकाच दिवशी जाहीर करत आहे. तर काही परीक्षा पुन्हा ऐनवेळेस पुढे ढकलल्या जात आहेत. परीक्षांचा हा घोळ थांबता थांबत नसल्याने नक्की कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहत आहे.
एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा आधी २ जानेवारी २०२२ ला जाहीर केली होती. मात्र, परीक्षेच्या दोन दिवस अगोदर अचानकपणे रद्द करून पुढे ढकलली. आता २३ जानेवारी २०२२ ही परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ हा येत्या २२ जानेवारी २०२२ ला होणार होता; मात्र तोही पुढे ढकलला असून आता २९ जानेवारी २०२२ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा आधी २९ जानेवारी २०२२ ला जाहीर केली होती; मात्र आता ही परीक्षा एक दिवसाने पुढे ढकलून ३० जानेवारी २०२२ ला घेण्यात येणार आहे.
परीक्षांच्या तारखांचा घोळ सुरूच
तसेच म्हाडाने सरळसेवेने विविध संवर्गातील पदांची भरती परीक्षा आधी १२ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र परीक्षेच्या एक दिवस आधी पेपर फुटल्याचे लक्षात आल्याने या परीक्षाही रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर सुधारित तारीख जाहीर करण्यात आली. त्यामध्ये २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत परीक्षा घेण्याची घोषणा केली होती; मात्र पोलीस उपनिरीक्षक पदांची आणि म्हाडाच्या परीक्षा एकाच दिवशी येत असल्याचे नंतर लक्षात आल्याने म्हाडाने पुन्हा २९ जानेवारीचे पेपर पुढे ढकलले आहेत. एकच परीक्षा सातत्याने पुढे ढकलत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार होत आहे. त्याचा परिणाम अभ्यासावर होत असल्याने नैराश्य येत आहे.
यंत्रणा याबाबत गांभीर्याने केव्हा विचार करणार
गेल्या काही वर्षांपासून एमपीएससी, म्हाडा, आराेग्य आणि एमआयडीसीच्या परीक्षा कधी अचानक पुढे ढकलल्या जातात. तर कधी त्यात काहीतरी गडबड, घोटाळा अथवा पेपर फुटीमुळे रद्द कराव्या लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची मात्र ससेहोलपट होत आहे. त्याची दखल संबंधित यंत्रणा घेत नसल्याचे दिसत आहे. यंत्रणा याबाबत गांभीर्याने केव्हा विचार करणार आहे, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.