पुणे आरटीओ कार्यालयाकडून परवान्यासाठी सकाळी साडेसात वाजता ‘परीक्षा’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:27 PM2020-09-19T13:27:48+5:302020-09-19T13:30:28+5:30

कोरोनापासून संरक्षणासाठी गर्दी नियंत्रित करण्याच्या उद्देशाने ही उपाययोजना

Examination for license from Pune RTO office at 7.30 am | पुणे आरटीओ कार्यालयाकडून परवान्यासाठी सकाळी साडेसात वाजता ‘परीक्षा’

पुणे आरटीओ कार्यालयाकडून परवान्यासाठी सकाळी साडेसात वाजता ‘परीक्षा’

googlenewsNext
ठळक मुद्देशिकाऊ परवान्यासाठीच्या चाचणीची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६प्रत्येकी दीड तासात १०० उमेदवारांची घेतली जाईल चाचणी

पुणे : पक्क्या व शिकाऊ परवान्यासाठी चाचणीच्या पूर्वनियोजित वेळेचा कोटा वाढविण्यात आल्याने सुरक्षित अंतराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सकाळी साडे सात वाजल्यापासून शिकाऊ परवान्यासाठी चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवार(दि. २१) पासून होणार असल्याची माहिती आरटीओ अजित शिंदे यांनी दिली.

परिवहन आयुक्तांच्या सुचनेनुसार पुणे आरटीओने पक्का व शिकाऊ परवान्यासाठीचा कोटा पूर्ववत केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा कोटा कमी असल्याने वेळ मिळण्यासाठी जवळपास १५ दिवसांचा कालावधी लागत होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर आयुक्तांनी राज्यातील सर्व कार्यालयांना कोटा पुर्ववत करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पुणे कार्यालयानेही शिकाऊ परवान्याचा कोटा ४०० वरून ६५०, पक्क्या परवान्यासाठी दुचाकीचा कोटा २६० वरून ४४० तर चारचाकीसाठीचा कोटा २०० वरून ३४० पर्यंत वाढवला. त्यामुळे चाचणीदरम्यान सुरक्षित अंतराचा प्रश्न निर्माण होणार होता. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिध्द करून त्यावर प्रकाश टाकला होता. यावेळी शिंदे यांनी चाचण्या सकाळी लवकर सुरू करण्याचे सुतोवाच केले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले असून आता शिकाऊ परवान्यासाठी सकाळी साडे सात वाजल्यापासूनची वेळ मिळणार आहे.

शिकाऊ परवान्यासाठीच्या चाचणीची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६ ही करण्यात आली आहे. यावेळेमध्ये प्रत्येकी दीड तासात १०० उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. त्यासाठी सात गट करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिकाऊ परवान्याचा कोटा ५० ने वाढवून ७०० करण्यात आला आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने कोटा वेळ घेता येणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. कोरोनापासून संरक्षणासाठी गर्दी नियंत्रित करण्याच्या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
------------- 

Web Title: Examination for license from Pune RTO office at 7.30 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.