खोदकामांमुळे सव्वादोन कोटींचा फटका
By admin | Published: April 20, 2017 06:41 AM2017-04-20T06:41:39+5:302017-04-20T06:41:39+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी इंटरनेट जोडण्याचे काम भारत संचार निगम लिमिटेडकडून (टेलिफोन) सुरू आहे
भोर : तालुक्यातील ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी इंटरनेट जोडण्याचे काम भारत संचार निगम लिमिटेडकडून (टेलिफोन) सुरू आहे. या कामांमुळे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ग्रामीण, जिल्हा व राज्यमार्गांच्या रस्त्याचे व गटारांचे मिळून सुमारे २ कोटी १४ लाख ८१५रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ग्रामपंचायतीचे व शेतकऱ्यांच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई देण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायती सर्व सुविधांयुक्त डिजिटल करण्यासाठी आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी गावागावांतील रस्ते उकरून केबल टाकली जात आहे. यामुळे ग्रामपंचायतीत लाईटबिल, फोनबिल, सर्व प्रकारचे दाखले गावातच मिळणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीत अद्ययावत प्रणाली होणार आहे. मात्र, काम करताना साईडपट्ट्या गटारे व झाडे उखडली आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे काढून ठेवले आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गटारांचे, रस्त्यांचे मिळून सुमारे १ कोटी २३ लाख रुपये, तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ग्रामीण, जिल्हा व राज्यमार्गांचे मिळून ९१ लाख २१ हजार ८१५ रुपये असे मिळून सुमारे २ कोटी १४ लाख २१ हजार ८१५ रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरची कामे तीन महिन्यांपासून अपूर्ण आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कामाची मुदत संपली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. पावसाळा जवळ आला असून अशीच परिस्थिती राहिल्यास गावातील रस्त्यांवर चिखलाचा राडा होऊन अपघात घडतील.या कामासाठी जमिनीत सुमारे ५ फूट खोल खड्डा खणून त्यात पाईप व नंतर आॅप्टिकल वायर टाकली जाणार आहे. मात्र सध्या फक्त पाईपच गाडला असून वायर टाकण्यासाठी अर्धा किलोमीटरवर खड्डे ठेवले आहेत.