' रेड झोन' वगळता धनकवडीतील उर्वरित भागात निर्बंध शिथील करा, नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:54 PM2020-05-15T12:54:12+5:302020-05-15T12:54:51+5:30
धनकवडीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या तेरा होती. त्यामधील दहा रूग्ण पूर्णपणे बरे झाले.
धनकवडी : शहरासह उपनगरांतही बाधीत झालेले रूग्ण बरे होत आहेत. धनकवडीत तेरा कोरोना बाधीत रूग्ण असल्यामुळे रेड झोनमध्ये समाविष्ट झालेल्या भागातील दहा रूग्ण बरे झाल्यानंतर बंधनं शिथील व्हावीत अशी मागणी होत आहे. किमान जानुबाई पथ हा धनकवडीचा मुख्य मार्ग खुला व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
धनकवडीत गेल्या महिनाभरात कोरोना बाधितांच्या एकूण संख्येने नागरिकांच्या मनात धास्ती वाढली होती. परिणामी गुलाबनगर आणि चैतन्यनगर हा भाग रेड झोन घोषित करण्यात आला. मुख्य रस्ता जानुबाई पथ गुलाबनगर चौक आणि शेवटचा बस थांबा बंद झाला. गावठाणातील महापालिकेचा दवाखाना, खासगी वैद्यकीय व्यवसायिकांचे क्लिनिक यांच्याकडे जाणाऱ्या रूग्णांना अडथळा झाला. प्रशासकीय अत्यावश्यक सेवा, महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थेतील वाहने, घनकचरा व्यवस्थापनातील वाहने, कचरा संकलक यांच्यासाठीही अडचणीचे ठरते आहे.
दरम्यान धनकवडीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या तेरा होती. त्यामधील दहा रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जे दोन रुग्ण शिल्लक आहे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. नागरिकांकडून देखील प्रशासनाला सहकार्य केले जात असून रेड झोनमधून वगळून धनकवडी परिसरातील बंधने शिथील व्हावीत अशी मागणी होत आहेत.
.................
माझे क्लिनिक धनकवडी शेवटचा बस थांबा परिसरात आहे. क्लिनिक कडे जाणारे बहुतांश रस्ते बंद आहेत. अशा परिस्थितीत क्लिनिक मध्ये अँडमिट पेशंट ला तातडीची मदत लागल्यास किंवा इमर्जन्सी आल्यावर आम्ही जायचे कसे अशा सामान्य प्रश्नाचे उत्तर कोण देणार.
- डॉ. प्रवीण दरक
..........................
गल्लीबोळातील रस्ते ठिक आहेत पण कृपया मुख्य रस्ता बंद करताना विचारपूर्वक बंद करावेत व अत्यावश्यक सेवेतील कर्मचा?्यांना पयार्यी व्यवस्थेची माहीती द्यावी. प्रभागातील अॅक्टीव्ह रूग्ण संख्या रोज समजली तर अफवा व गैरसमजूतीला आळा बसेल, नागरिकांनी सुद्धा अती आवश्यक असेल तरच बाहेर पडावे.दूध फळे भाजीपाला देता घेताना संसर्ग न होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. - प्रिती पासलकर - औषध निर्माण अधिकारी, कै.विलासराव तांबे दवाखाना, धनकवडी.