राज्यातील सर्व विद्यापीठांच्या 'ट्यूशन फी' वगळता इतर शुल्क कमी होणार: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 04:45 PM2021-06-27T16:45:48+5:302021-06-27T16:46:08+5:30
सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सोमवारी ऑनलाईन बैठक; एफआरए व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कावर निर्णय घेणार
पुणे: राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व विद्यापीठांना 'ट्यूशन फी' वगळून इतर शुल्क कमी करता येऊ शकते का? याबाबत येत्या सोमवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे प्रयोगशाळा, कॉम्पुटर लॅब, जिमखाना, ग्रंथालय आदी गोष्टींचा लाभ विद्यार्थी घेत नाहीत. त्यामुळे हे शुल्क कमी करावे, अशी मागणी केली जात होती. त्यावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे २६ हजार रुपये शुल्क कमी करण्यात आले. राज्यातील सर्व विद्यापीठांना याबाबत आवाहन केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित महाविद्यालयांचे शुल्क निश्चित करण्याचे अधिकार रेगुलेटिंग ॲथोरिटीला (एफआरए) आहे. तांत्रिक कारणामुळे एफआरए समिती स्थापन होऊ शकली नव्हती. एफआरए स्वायत्त असून व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क कमी करण्याबाबत या समितीकडून शासनाला प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यावर निर्णय घेतला जाईल. तसेच एफआरए स्वतः विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेऊ शकते.
एआयसीटीईने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे सूचना केल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी घेतली जाणार आहे. तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी घ्यावी किंवा नाही,याबाबतचा निर्णय इयत्ता बारावीची गुणपत्रिका हातात पडल्यावर गुणपत्रिकेचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणपत्रिकेच्या आधारित केले जातील, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.