अनोख्या चार्जरचे मिळवले पेटंट
By admin | Published: January 24, 2017 01:45 AM2017-01-24T01:45:16+5:302017-01-24T01:45:16+5:30
मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त वेळ चार्जिंग झाल्यास बॅटरी खराब होऊ शकते किंवा ब्लास्ट होऊ शकते़
सचिन कांकरिया / नारायणगाव
मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त वेळ चार्जिंग झाल्यास बॅटरी खराब होऊ शकते किंवा ब्लास्ट होऊ शकते़ असे होऊ नये म्हणून जुन्नर तालुक्यातील दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी रिमुव्हेबल चार्जिंग पिन मेकॅनिझम हे डिव्हाईस तयार केले आहे. या डिव्हाईसमुळे १०० टक्के बॅटरी चार्जिंग होताच चार्जिंग पिन आॅटोमॅटिक बाहेर येईल, असा शोध लावला आहे़ त्यांच्या या डिव्हाईसला आयपी इंडियामध्ये पेटंट मिळाला आहे़ दोन तरुणांच्या या नावीन्यपूर्ण शोधाचे कौतुक होत आहे़ विशेष म्हणजे, दोन्ही विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत़
डी़ वाय़ पाटील स्कूल आॅफ इंजिनिअरिंग येथे तृतीय वर्षात आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग करणाऱ्या नारायणगाव येथील अभिजित मनोहर बनकर व पीडीईएएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग हडपसर येथील तृतीय वर्षात मेकॅनिकल करणाऱ्या व जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथील श्रीरंग अंबादास डोके या दोन तरुणांनी रिचेबल बॅटरीमध्ये उपयुक्त असे रिमुव्हेबल चार्जिंग पिन मेकॅनिझम हे डिव्हाईस तयार केले आहे़
हे उपकरण चार्जिंग बॅटरीला जोडल्यास बॅटरी कार्यक्षमतेने चार्जिंग होते व बॅटरी ब्लास्ट होण्यापासून वाचते़ या डिव्हाईसचा उपयोग मोबाईल, लॅपटॉप, एमपीथ्री प्लेअर, वाय-फाय स्पीकर व इतर सर्व रिचार्जेबल डिव्हाईसमध्ये होऊ शकतो़ या उपकरणाचा उपयोग सरंक्षणक्षेत्रातही होऊ शकतो, असा दावा बनकर व डोके यांनी केला आहे़ हे डिव्हाईस बनविण्याची संकल्पना कशी सुचली, याबाबत लोकमतशी बोलताना अभिजित बनकर म्हणाले, की आपला मोबाईल चार्जिंगला लावला होता़ चार्जिंग पूर्ण होऊनही चार्जिंग सुरूच राहिल्याने बॅटरी खराब झाली़ यावरून आपण यावर काहीतरी उपाययोजना करू शकतो, अशी संकल्पना सुचली व आपला मित्र श्रीरंग डोके याच्या सोबतीने आॅगस्ट २०१६मध्ये संशोधनाला सुरुवात केली़ (वार्ताहर)