Maharashtra: सलग चौथ्या वर्षी राज्यात जादा पाऊस, यंदा सरासरीच्या २३ टक्के अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 12:19 PM2022-10-01T12:19:59+5:302022-10-01T12:21:12+5:30
राज्यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात झाला आहे...
पुणे : राज्यात सलग चौथ्या वर्षी अतिरिक्त पाऊस पडला आहे. यंदाही सरासरीपेक्षा २३ टक्के जास्त पाऊस झाला आहे. यंदा जूनमधील अतिरिक्त पावसाने राहिलेली उर्वरित तीन महिन्यांतील तूट भरून काढली असून, पावसाळ्याच्या चार महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा अतिरिक्त बरसला आहे. राज्याची सरासरी ९९४.५ असताना, ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात १२१९.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून, येथे सरासरीच्या तब्बल ६१ टक्के जास्त पाऊस झाला आहे; तर सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी झाला आहे.
सर्वाधिक नाशिक, सर्वात कमी सांगली
राज्याचा विचार करता, विदर्भात सर्वाधिक ३१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २६ टक्के, मराठवाड्यात २४ टक्के, तर कोकणात ९ टक्के, तर जास्त पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून, येथे सरासरीच्या तब्बल ६१ टक्के जास्त पाऊस झाला आहे; तर मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात ४६ टक्के जादा झाला आहे; तर हिंगोलीत सरासरीच्या ११ टक्के कमी झाला आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात ३३ टक्के जादा पाऊस झाला आहे. मुंबई शहरात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला आहे.
सप्टेंबरमध्ये ५० टक्के जादा
राज्यातील सर्व उपविभागांमध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात या महिन्यात सरासरीच्या तुलनेत ३० ते ४५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. १ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त पाऊस झाला असून, ही सरासरी १७२.५ मिलिमीटर असून, प्रत्यक्षात २५९.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
२०१९ नंतर राज्यात सलग चौथ्यावर्षी मान्सून अधिकचा बरसला आहे. राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी मान्सून पाऊस ९९४.२ मिलिमीटर असतो. २०२१ पर्यंत गेल्या तीन वर्षांत राज्यात पावसाळ्यात ११७६ ते १३६० मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदादेखील हा पाऊस १२१९.७ मिलिमीटर झाला आहे.
स्थिती पावसाला अनुकूल
हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम काश्यपी म्हणाले, "जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनेकवेळा बंगालच्या उपसागरावर सतत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यामुळे मध्य भारतातील काही भाग तसेच महाराष्ट्रात चांगला पाऊस पडला. यामुळे तयार झालेल्या प्रणालींची दिशा पश्चिमेकडे किंवा पश्चिम-वायव्य अशी होती. परिणामी मान्सूनचा पट्टा त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे सरकण्यास मदत झाली.”
पुढील तीन दिवस पाऊस
हवामान विभागाने राज्यभरात येत्या तीन दिवसांत पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून, विशेषतः कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची अपेक्षा आहे.