फुकट दारूसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचा हॉटेलात धिंगाणा; कर्मचाऱ्यांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:42 PM2023-10-16T12:42:51+5:302023-10-16T12:43:02+5:30
मध्यरात्री हॉटेल बंद करण्याची प्रक्रिया सुरू असताना संबंधित अधिकारी मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी आले होते
किरण शिंदे
पुणे: दारू न दिल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने पुण्यातील हॉटेलमध्ये धिंगाणा घालत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. या कर्मचाऱ्यावर आता कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विकास आबने असे गोंधळ घालणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री हॉटेल बंद करण्याची प्रक्रिया सुरू असताना संबंधित अधिकारी मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी आले. आपण उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याकडे दारूची मागणी केली. यावर कर्मचाऱ्याने हॉटेल बंद झाले असून आता देता येणार नाही असे सांगितले. यामुळे संतापलेल्या संबंधित अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी त्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.