Pimpri Chinchwad: एक्साइजने हाणून पाडला विदेशी मद्य विक्रीचा डाव, आंबेगाव तालुक्यात कारवाई
By नारायण बडगुजर | Published: October 4, 2023 04:33 PM2023-10-04T16:33:45+5:302023-10-04T16:34:29+5:30
आंबेगाव तालुक्यातील माैजे पोंदेवाडी गावाच्या हद्दीत ही कारवाई केली...
पिंपरी : प्रतिबंधित विदेशी मद्य तसेच गोवा राज्यातील मद्य विक्रीसाठी आणले. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साइज) पथकाने कारवाई करून एक लाख ६२ हजारांच्या मद्यासह एकूण १० लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आंबेगाव तालुक्यातील माैजे पोंदेवाडी गावाच्या हद्दीत ही कारवाई केली.
सतीश नानाभाऊ रणपिसे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार, विदेशी मद्य विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या नारायणगाव विभागातर्फे आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. यात एक चारचाकी वाहनात गोण्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे संशयावरून वाहनाची तपासणी केली असता त्यात मद्य मिळून आले. गोवा राज्यात निर्मिती केलेले मात्र महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले मद्य तसेच प्रतबंधित असलेले विदेशी मद्य या चारचाकी वाहनातू मिळून आले. प्रतिबंधित मद्याच्या एक लाख ६२ हजार रुपये किमतीचे मद्य असलेल्या २४३ बाटल्या मिळून आल्या. या मद्य साठ्यासह एक्साइजच्या पथकाने चारचाकी वाहन व वाहन चालकाच्या ताब्यातील मोबाइल असा एकूण १० लाख चार हजार रुपयं किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सतीश रणपिसे आणि इतर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
एक्साइजचे पुणे अधीक्षक चरणजितसिंग राजपूत, उपअधीक्षक युवराज शिंदे, एस. आर. पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव विभागाचे निरीक्षक सुनील गायकवाड, भरारी पथकाचे निरीक्षक समीर पाटील, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, एम. एस. धोका, एस. एफ. ठेंगडे, प्रवीण देशमुख, जवान जयदास दाते, संदीप सुर्वे, मुकुंद पोटे, शरद हांडगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक
जप्त केलेले हे मद्य महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित आहे. तरीही या मद्यसाठ्याची वाहतूक करून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी आणला होता. मात्र, एक्साइजने कारवाई करून हा डाव हाणून पाडला. तसेच यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे, असे एक्साइजचे अधीक्षक चरणजितसिंग राजपूत यांनी सांगितले.