‘आप’च्या कार्यकर्त्यांत संचारला उत्साह
By admin | Published: February 11, 2015 01:02 AM2015-02-11T01:02:27+5:302015-02-11T01:02:27+5:30
दिल्ली मांगे दिल से, केजरीवाल फिर से अशा जोरदार घोषणाबाजीने पिंपरी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा निनाद, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या
पिंपरी : दिल्ली मांगे दिल से, केजरीवाल फिर से अशा जोरदार घोषणाबाजीने पिंपरी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा निनाद, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारे अभियंते कार्यकर्ते म्हणून कारमधून पिंपरीत रस्त्यावर उतरले. डोक्यावर ‘आप’च्या टोप्या, हातात झेंडे, तसेच पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडू घेऊन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जल्लोष साजरा केला. आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत विजयाने हरखून गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी पेढे, पुरणपोळी वाटून आनंदोत्सव साजरा केला.
देशात सर्वत्र भाजपच्या लाटेचा करिष्मा दिसून येत असताना, दिल्ली विधानसभा निवडणुुकीत ‘आप’ने ७० पैकी ६७ जागांवर विजय संपादन केला. सामान्य जनतेचा कौल मिळविण्यात ‘आप’ने पुन्हा एकदा यश मिळविले. हा सामान्य जनतेचा विजय आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विजयश्री खेचून आणली. भाजपला पिछाडीवर टाकून ‘आप’ने खेचून आणलेली विजयश्री कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणारी असून, उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मंगळवारी दुपारी ३ ला येथील चौकात जमा झाले. दिल्लीतील विधानसभेचा निकाल स्पष्ट होताच, ‘आप’चे कार्यकर्ते विजयोत्सवासाठी घराबाहेर पडले. काहीजण दुपारनंतर रजा काढून कंपनीतून बाहेर पडले. (प्रतिनिधी)