पोलीस निरीक्षकाच्या 'त्या' फोनने उडाली खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:45 PM2021-09-30T22:45:55+5:302021-09-30T22:46:19+5:30
Pune : एका व्यक्तीने पोलीस आयुक्तालयात स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना ताजी असतानाच आता स्वत: पोलीस निरीक्षकच आत्मदहनाची भाषा करीत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
पुणे : शहर पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन ऐरवी खणखणत असतोच. पण गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका फोनने संपूर्ण शहर पोलीस दलात खळबळ उडाली. तो फोन एका पोलीस निरीक्षकांचा होता. एका व्यक्तीने पोलीस आयुक्तालयात स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना ताजी असतानाच आता स्वत: पोलीस निरीक्षकच आत्मदहनाची भाषा करीत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
हे निरीक्षक पोलीस आयुक्तालयात येण्यासाठी निघण्यापूर्वीच पोलिसांच्या व्हॅन सायरन वाजत त्यांच्या घरी पोहचल्या. त्यांना तेथेच थांबविण्यात आले. त्यांची पत्नी व त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर ते शांत झाले. आपण असे काही करणार नाही, असे त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वाहतूक शाखेत नेमणुकीला असलेल्या या निरीक्षकांची गेल्या काही दिवसात तिसर्यांदा बदली झाली होती. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यातूनच त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करुन आपण पोलीस आयुक्तालयात येऊन आत्मदहन करणार असल्याचे कळविले होते.
हे समजल्यानंतर चतु:श्रृंगी पोलीस व अन्य ठिकाणचे पोलीस सर्तक झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तातडीने त्यांच्या घरी पोहचले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना असे कृत्य न करण्याविषयी ताकीद देण्यात आली. यापार्श्वभूमीवर आयुक्तालयातील काही वरिष्ठ अधिकार्यांची बैठक देखील झाल्याचे समजते.