शहरात उत्साह ग्रामीण भागात निरुत्साह; पुण्यात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान
By नितीन चौधरी | Published: May 13, 2024 10:03 AM2024-05-13T10:03:55+5:302024-05-13T10:04:35+5:30
पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात शहरी भागात मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे
पुणे : पुणे शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या काळात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी ६.६१, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ५.३८ तर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ४.९७ टक्के मतदान झाले आहे अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दिसत असून मतदार यादीत नाव वगळल्याच्या तक्रारी ही मतदारांकडून येत आहेत पहिल्या दोन तासात मतदान शांततेत पार पडल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्यातील चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी आज पुणे शिरूर मावळ मतदार संघासाठी मतदान सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाले आहे. पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात शहरी भागात मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे. तर ग्रामीण भागात फारसा उत्साह नसल्याचेही चित्र आहे. शहरी भागांमध्ये अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीत नावे सापडत नसल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत आहेत. सकाळच्या टप्प्यात अनेक नोकरदार मतदारांनी रांगा लावले असून ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. शहराच्या बहुतांश भागांमध्ये सकाळच्या या टप्प्यात गर्दी असल्याचे दिसून येत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दोन तासात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. मात्र ग्रामीण भागात उत्साहन असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात ४.९७ टक्के मतदान झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील मतदानाला तुलनेने बरा प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी ५.३८ टक्के मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मॉक पोलवेळी ३७ बॅलेट युनिट १३ कंट्रोल यूनिट आणि १७ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. पुणे लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मॉक पोलवेळी २४ बॅलेट युनिट ८ कंट्रोल यूनिट आणि २४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. शिरूर लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलवेळी २४ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे.