निर्बंधमुक्त गणेशोत्सव! उत्साहाला उधाण; पुण्यातील मानाच्या गणेशांची वाजत गाजत प्रतिष्ठापना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:07 PM2022-08-31T22:07:11+5:302022-08-31T22:08:35+5:30
दोन वर्षे कोरोनामुळे अनेक निर्बंधात बांधलेला गणेशोत्सव यंदा निंर्बंधमुक्त झाल्यामुळे उत्साहाला उधाण आले आहे...
पुणे: पुण्यातील पाच मानाच्या गणपतींसह मोठ्या मंडळांच्या गणपतींची दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वाजत गाजत प्रतिष्ठापना झाली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेक निर्बंधात बांधलेला गणेशोत्सव यंदा निंर्बंधमुक्त झाल्यामुळे उत्साहाला उधाण आले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झालेला जल्लोष दुपारी साडेतीनपर्यंत पहायला मिळाला आणि पुण्यातील मिरवणूक मार्ग गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहत होता.
पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणुक सकाळी नऊच्या सुमारास सुरु झाली. पालखीमध्ये गणरायांची मुर्ती आणि त्यापुढे ढोल ताशा पथक, अशा दिमाखात ही मिरवणूक निघाली. साडेअकराच्या सुमारास प्रतिष्ठापना झाली. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्रवीरांना अभिवादन म्हणून मंडळाने हुतात्मा राजगुरू यांचे नातू धैर्यशील आणि सत्यशील यांच्या हस्ते पुजा आयोजिली होती.
त्यापाठोपाठ मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणुक सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु झाली. या हीगणेशाची मिरवणूक परंपरेप्रमाणे पालखीतून झाली. दुपारी एकच्या सुमारास गणेशाची प्रतिष्ठापणा झाली. या मिरवणुकीत नगरावादनाने विशेष लक्ष वेधून घेतले. न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड, शिवमुद्राढोल-ताशा पथक सहभागी झाले होते.
मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु झाली. भव्य दिव्य सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली त्यामुळे महिलांचे ढोल ताशा पथक ही या मिरवणूकीची वैशिष्ठे ठरली. दुपारी अडचीच्या सुमारास गणेशाची थाटामध्ये प्रतिष्ठापना झाली.
मानाचा चौथा गणपती असेलेल्या तुळशीबाग गणपतीची मंडळाची मिरवणूक सकाळी अकराच्या सुमारास सुरु झाली शिवगर्जना, समर्थ आणि उगम या संस्थेच्या ढोल पथकाना लक्ष्मी रस्ता परिसर दणाणून गेला. ‘समर्थ’ने ढोल पथकाबरोबर शालेय मुलांचे ढाल तलवार पथकाचा समावेश केला होता त्या मुलांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. पूनीत बालन यांच्या हस्ते प्रतिष्ठापना पूजा झाली.
मानाचा पाचवा गणपती अर्थात केसरीवाडा गणेशाची मिरवणूक सकाळी दहाच्या सुमारास निघाली चांदीच्या पालखीत निघालेला केसरीवाड्याच्या गणेश साऱ्यांचे आकर्षण ठरले श्रीराम पथक, शिवमुद्रा ढोलताशा आणि बिडवे बंधू यांचे नगारा वादन यामुळे या मिरवणुकीने रणबागा चौक ते केसरीवाडा परिसर दणाणून गेला होता.