खळबळजनक! सदाशिव पेठेतील जुन्या इमारतीत आढळला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 09:11 AM2021-01-12T09:11:10+5:302021-01-12T09:11:23+5:30
मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती.
पुणे : सदाशिव पेठेतील जुन्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना तेथे एका महिलेचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. सुमारे ४ ते ५ दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला असण्याची शक्यता असून मृतदेह डिक्मपोज झाला आहे.
याबाबतची माहिती अशी, सदाशिव पेठेतील ब्राम्हण मंगल कार्यालयाशेजारी गुरुकृपा इमारत आहे. ही इमारत सतीश सासवडकर यांच्या मालकीची आहे. ३० ते ३५ वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या या इमारतीचे अंतर्गत बांधकाम सुरु आहे. त्यामुळे सासवडकर कुटुंबीय सध्या दुसर्या ठिकाणी रहायला गेले आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून इमारतीतून कुबट वास येत होता. याची माहिती परिसरातील लोकांनी विश्रामबाग पोलिसांना सोमवारी दुपारी कळविली. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंडलीक कायगुडे, उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. ज्या ठिकाणाहून वास येत होता. त्या ठिकाणचे साहित्य बाजूला केल्यावर त्या खाली महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह डिक्म्पोज झाला असून त्याला आळ्या पडल्या होता. महिलेच्या अंगावर साडी होती. मृतदेहाची स्थिती पाहता तिचा किमान ४ ते ५ दिवसांपूर्वी मृत्यु झाला असावा, असे वाटते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यातून महिलेच्या मृत्युचे कारण समजू शकेल. या प्रकरणी संबंधितांकडे चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहे