कॉर्पोरेट संकल्पनेने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह - ज्ञानेश्वर शिवथरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:23 AM2018-09-25T01:23:37+5:302018-09-25T01:23:50+5:30

पोलीस कार्यालयाच्या संरचनेत कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे बदल केल्यास कर्मचाºयांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. कामाचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण होते.

 Exciting enthusiasm among employees - Dnyaneshwar Shivthree | कॉर्पोरेट संकल्पनेने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह - ज्ञानेश्वर शिवथरे

कॉर्पोरेट संकल्पनेने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह - ज्ञानेश्वर शिवथरे

Next

पोलीस कार्यालयाच्या संरचनेत कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे बदल केल्यास कर्मचाºयांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. कामाचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण होते. कॉर्पोरेट संकल्पनेसोबत पोलीस कार्यालयात नागरिकांच्या समस्यांची तातडीने सोडवणूक करण्यात येत आहे. नागरिकांना एकाच कामाकरिता चकरा मारायला लागू नये या पद्धतीने काम ठरवून दिल्याने लोणावळा उपविभागीय कार्यालयाला पुणे जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आयएसओ मानांकन प्राप्त झाले. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली.

‘‘माझ्या मनातील ‘आयएसओ’ची संकल्पना मी वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यादृष्टीने प्रयत्न करण्याकरिता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केलेले मार्गदर्शन व विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे झीरो पेंडन्सी या पुस्तकाचा मला फार उपयोग झाला,’’ असे शिवथरे आवर्जून सांगतात.
पोलीस विभागातील काम हे निरंतर चालणारे काम आहे. मात्र या कामात सुसूत्रता व नीटनेटकेपणा आणल्यास कर्मचाºयांचा कामाच्या ठिकाणी उत्साह वाढेत व चांगल्या वातावरणात चांगले काम होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत लोणावळा उपविभागीय कार्यालयात उपलब्ध जागेचा वापर करत बदल करण्यास सुरुवात केली. यामध्ये प्रथम कार्यालयाची रंगरंगोटी, अंतर्गत रचनेत अपेक्षित बदल, रेकॉर्डचे झीरो पेन्डन्सीच्या निकषाप्रमाणे वर्गीकरण करत रॅकमध्ये त्यांची मांडणी केली. कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचाºयांना स्वतंत्र स्वच्छतागृह, बसण्याकरिता जागा, टेबल-खुर्ची, संगणक यांची योग्य मांडणी, कार्यालयात ग्रंथालय, सरकारी नियमांप्रमाणे फलक, क्राइम तक्ता, विभागाचा नकाशा, महाराष्ट्र सेवा हक्क अध्यादेशाप्रमाणे भिंतीवर माहिती तक्ते, महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलीस काय करतात याची माहिती, तसेच त्यांच्याकरिता टोल फ्री क्रमांक याची माहिती दर्शनी भागात लावण्यात आली. अभ्यागतांसाठी बैठक व्यवस्था केली.
कार्यालय परिसरात स्वच्छता, अभ्यागतांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ व माहितीफलक, स्वच्छतागृह, तसेच सुरक्षेकरिता फायर टँक लावले आहेत. नागरिकांना काही समस्या असल्यास आॅनलाइन तक्रारीसाठी माझा व विभागातील चारही पोलीस निरीक्षकांचे फोन नंबर प्रसिद्ध केले आहेत. विभागात कोणत्याही पोलीस स्थानकात नागरिकांच्या समस्यांची वेळेत सोडवणूक होत नसल्यास मला थेट संपर्क साधावा, असे आवाहन
करत पोलीस कामकाजात गतिमानता आणण्याचा प्रयत्न केला.
कामाचे सुयोग्य नियोजन केल्याने कामात सुसूत्रता आली. तसेच नागरिकांच्या समस्यांची वेळेत सोडवणूक होऊ लागल्याने नागरिक व पोलीस यांच्यात एकोपा साधला जाऊन गुन्हे कमी होण्यासदेखील मदत झाली. कार्यालयाची योग्य पद्धतीने संरचना झाल्याने पहिल्याच प्रयत्नात लोणावळा उपविभागीय कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले. यानंतर दिल्ली येथील आयएसओ टीमने दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे पालन करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट आयएसओच्या दृष्टीने वाटचाल केली. सोबत लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याची देखील संरचना केली. दिल्ली येथील पथकाने तिन्ही कार्यालयांना भेट देत कामांचे सुक्ष्म निरीक्षण नोंदविले. त्यांच्या सर्व निकषात आम्ही बसल्याने लोणावळा उपविभागीय कार्यालय, लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याला स्मार्ट आयएसओ हे मानांकन प्राप्त झाले आहे. लोणावळा उपविभागातील कामशेत व वडगाव या पोलीस ठाण्यांमध्ये देखील स्मार्ट आयएसओच्या दृष्टीने बदल केले आहेत. मात्र त्या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ग्रामपंचायत निवडणूक असल्याने काही वर्गीकरणाची कामे बाकी आहेत. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरअखेर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत व वडगाव पोलीस ठाणेदेखील आयएसओ प्राप्त होतील, यात तिळमात्र शंका नाही. लोणावळा उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यालयांतील कामकाज स्मार्ट व लोकाभिमुख करण्याचा आमचा मानस आहे.

Web Title:  Exciting enthusiasm among employees - Dnyaneshwar Shivthree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.