भूसंपादनातून १३० हेक्टर जमिनी वगळा, चाकण नगर परिषदेकडून निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:21 AM2018-02-08T01:21:31+5:302018-02-08T01:21:38+5:30
एमआयडीसीने टप्पा क्रमांक ५ करिता भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपादनातून वगळण्याची मागणी नगर परिषदेने एमआयडीसीकडे केली आहे.
चाकण : एमआयडीसीने टप्पा क्रमांक ५ करिता भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपादनातून वगळण्याची मागणी नगर परिषदेने एमआयडीसीकडे केली आहे.
चाकण शहराची औद्योगिकीकरणामुळे वेगाने वाढणारी लोकसंख्या व शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर येणारे व स्थायिक होणारे स्थलांतरित नागरिक यामुळे नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी नगर परिषदेवर आहे. चाकणच्या आसपास औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने चाकण शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातच चाकण एमआयडीसीच्या टप्पा क्र. ५ करिता चाकण शहरातील सुमारे १३० हेक्टर जमीन भूसंपादन करण्याची कार्यवाही एमआयडीसीकडून सुरू झाल्यामुळे शहरातील सुविधानिर्मितीसाठी जागेची अडचण निर्माण होणार आहे. सद्य:स्थितीत चाकण शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. हीच बाब विचारात घेता शहरातील जागा संपादनातून वगळावी, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे. यासाठी नगर परिषदेचे प्रयत्न सुरू असून, जमीन भूसंपादनातून वगळावी म्हणून आज नगराध्यक्षा मंगलताई गोरे व उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी याबाबतचे निवेदन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांना दिले.