हडपसर वगळून नवी पालिका करा
By admin | Published: June 27, 2015 03:45 AM2015-06-27T03:45:51+5:302015-06-27T03:45:51+5:30
हडपसर-हवेली स्वतंत्र नवीन महापालिका स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने महापालिकेकडे अभिप्राय मागविला होता, त्यावर हडपसर व महापा
पुणे : हडपसर-हवेली स्वतंत्र नवीन महापालिका स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने महापालिकेकडे अभिप्राय मागविला होता, त्यावर हडपसर व महापालिकेमध्ये समाविष्ट होऊन ३४ गावे वगळून शासनाने नवी महापालिका स्थापन करावी, असा ठराव विधी समितीने मंजूर केला आहे. नव्या पालिकेत हडपसराचा समावेश व्हावा, या भाजपा आमदारांनी केलेल्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसर परिसरातील नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. त्यानुसारच विधी समितीत ठराव मंजूर करण्यात आला असून त्याला भाजपच्या सदस्यांनी पाठिंबा दिला आहे.
स्वतंत्र महापालिकेबाबत राज्य शासनाला काय अभिप्राय द्यायचा, याचा निर्णय मुख्यसभेमध्ये घेण्यात येणार आहे. त्यानुसार त्याबाबतचा प्रस्ताव विधी समितीसमोर ठेवण्यात आला होता. विधी समितीमध्ये एक महिन्यापासून हा विषय प्रलंबित होता. शुक्रवारी झालेल्या विधी समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने शहराच्या सभोवतालची ३४ गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा १८ डिसेंबर २०१३ रोजी ठराव केला आहे. या ३४ गावांव्यतिरिक्त इतर गावे घेऊन शासनाने स्वतंत्र महापालिका करावी, अशी उपसूचना माजी महापौर वैशाली बनकर यांनी मांडली. या ठरावाला भाजपाचे सदस्य प्रतिमा ढमाले, नीलिमा खाडे यांनी तसेच काँग्रसेच्या सुनंदा गडाळे, शितल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सचिन दोडके यांनी अनुमोदन दिले व या ठरावास मंजुरी देण्यात आली
भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांनी पुणे महापालिकेवर कामाचा ताण वाढत असल्याने हडपसर-हवेली ही स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्य शासनाने यावर पुणे महापालिकेचा अभिप्राय मागविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर परिसरातील नगरसेवकांनी हडपसरचा समावेश स्वतंत्र महापालिकेमध्ये करण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. पुणे महापालिकेच्या नावास मोठे वलय असून ‘क’ दर्जाच्या नव्या पालिकेत आमचा समावेश नको, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली आहे.