वापरात नसलेली अक्षरे वगळावीत
By admin | Published: January 11, 2017 03:35 AM2017-01-11T03:35:30+5:302017-01-11T03:35:30+5:30
भाषाव्यवहार हा सदैव वादाचा विषय ठरला आहे. भाषेचे आकलन आणि मान्यता एवढाच शुद्धलेखनाचा व्याप आहे. भाषा आपल्याला कळणे, तिचे बहुसंख्य लोकांना आकलन होणे आणि ती लिखित स्वरूपात अवतरणे
पुणे : भाषाव्यवहार हा सदैव वादाचा विषय ठरला आहे. भाषेचे आकलन आणि मान्यता एवढाच शुद्धलेखनाचा व्याप आहे. भाषा आपल्याला कळणे, तिचे बहुसंख्य लोकांना आकलन होणे आणि ती लिखित स्वरूपात अवतरणे असा शुद्धलेखनाचा विचार होऊ शकतो. वर्णमालेतील वापरात नसणाऱ्या अक्षरांचा पुनर्विचार व्हावा आणि उपयोग नसल्यास ही अक्षरे वगळावीत, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. मसापचे परीक्षा विभागाचे कार्यवाह माधव राजगुरू यांनी ती तयार केली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ भाषाअभ्यासक डॉ. प्र. ना. परांजपे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले. या समारंभाला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘प्रत्येक भाषेमध्ये शुद्धलेखनाबाबत शंका असतात. त्यांची चर्चा होऊन सुवर्णमध्य काढला जाणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीमध्ये शुद्धलेखन पुस्तिकेबाबतचा मुद्दा चर्चेला घेऊन अनुदान प्राप्त करण्याचा प्रयत्न करून अल्पदरात पुस्तिका अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.’
राजगुरू म्हणाले, ‘भाषाव्यवहार, लेखनव्यवहारामध्ये शुद्धलेखन महत्त्वाचे असते. भाषेबाबत अनेकदा चुकीच्या संकल्पना रूढ असतात. त्यामुळे चुकीचे नियम बरोबर वाटू शकतात. त्यासाठी शुद्धलेखन पुस्तिका मार्गदर्शक ठरू शकते.’