विमा योजनेतून सोयाबीनला वगळले; शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:30 AM2018-07-28T03:30:31+5:302018-07-28T03:31:08+5:30
नाचणी पिकालाही मिळणार नाही नुकसानभरपाई
गहुंजे : पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार खरीप हंगाम २०१८ साठी मावळ तालुक्यात या वर्षी फक्त भात व भुईमूग या दोनच पिकांचा समावेश करण्यात आल्याने या दोनच पिकांना विमा संरक्षण उपलब्ध होणार असून, संबंधित पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१८ देण्यात आली आहे. मात्र, मावळ तालुक्यातील नाचणी व सोयाबीन या पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या योजनेंतर्गत पीक विमा उतरविण्यासाठी शेतकºयांनी दोन टक्के विमा हप्ता रक्कम भरल्यास उरलेली ९८ टक्के रक्कम शासन भरणार आहे. शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत नजीकच्या बँक शाखेत व आपले सरकार सेवा केंद्रात विमा हप्ता आॅनलाइन भरणा करता येणार आहे. विमा हप्ता भरताना अर्जासोबत शेतकºयांना सात-बारा (7/12), 8 अ, बँक खात्याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करावी लागणार आहे. जिल्हा सहकारी बँक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, सोसायटी सचिव यांच्याशी पीक विमा योजनेत सहभागासाठी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
काळे कॉलनी येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत या विमा योजनेची शिवली, कोथुर्णे, मोरवे, शिलिंब, जवन, ठाकुरसाई, करुंज, कढधे, तुंग, महागाव, धनगव्हाण, काले आदी गावांमध्ये प्रचार-प्रसिद्धीचे काम सुरू असून, परिसरातील शेतकºयांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे यांनी केले आहे.
भात व भुईमूग पिकांसाठी विमा हप्ता दोन टक्के दराने आकारण्यात येणार आहे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी 842 रुपये विमा हप्ता आकारण्यात येणार असून 42 हजार 100 रुपये संरक्षित रक्कम असणार आहे. भुईमूग पिकासाठी प्रति हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता आकारण्यात येणार असून, 31500 प्रति हेक्टरी रुपये संरक्षित रक्कम राहणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार भात व भुईमुग पिकांचे नुकसान व स्थानिक नैसर्गिक नुकसानीच्या बाबी विमा संरक्षणात समाविष्ट असल्याचे कृषी सहायक अधिकारी विकास गोसावी,दत्तात्रय गावडे, ज्ञानेश्वर बुचडे, शीतल गिरी यांनी सांगितले आहे.