आदिवासी भागातील हिरवा चारा संपुष्टात
By admin | Published: January 9, 2017 02:02 AM2017-01-09T02:02:23+5:302017-01-09T02:02:23+5:30
डोंगरावरील चारा वाळू लागल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदा आॅक्टोबर महिन्यापासूनच डोंगर उघडे बोडके दिसू लागले आहेत.
डिंभे : डोंगरावरील चारा वाळू लागल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदा आॅक्टोबर महिन्यापासूनच डोंगर उघडे बोडके दिसू लागले आहेत. याचा परिणाम पाळीव जनावरांच्या चाराटंचाईवर होणार असून हिरव्या चाऱ्याअभावी आदिवासी भागातील दूधव्यवसाय अडचणीत येणार आहे. पाळीव जनावरे जगविण्यासाठी यंदा आदिवासी शेतकऱ्यांना कसरत करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात, नाचणी, वरईच्या शेतीबरोबर संसारप्रपंचाला हातभार लावण्यासाठी काहीअंशी दूधव्यवसाय केला जातो. गावठी गाई व म्हशींपासून मिळणाऱ्या दुधावर येथील शेतकऱ्यांना दोन पैसे उपलब्ध होतात. परंतु या शेतकऱ्यांना इतर समस्यांबरोबरच पाळीव जनावरांच्या चारा-पाण्याचीही टंचाई नेहमीच जाणवत असते. पावसाळा सुरू झाला, की डोंगरावरील चारा व झाडपाल्याच्या रूपाने जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो. पुढे आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत डोंगरावरील हिरवा चारा व गवत कापून शेतकरी जनावरांच्या उन्हाळी चाऱ्याची व्यवस्था करताना पाहावयास मिळतात.
परंतु यंदा या भागातून पावसाने लवकर काढता पाय घेतला. याचा फटका भातशेतीला तर बसलाच. मात्र आता डोंगरावरही चाराही लवकर वाळून गेल्याने या परिसरातील अनेक डोंगर आॅक्टोबर महिन्यापासूनच उघडे बोडके होऊ लागल्याचे पाहावयास मिळाले. सध्या तर अनेक डोंगरावरील चारा वाळून संपुष्टात येऊ लागला आहे. डोंगर मोकळे होऊ लागले असून सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे.
उन्हाळी हंगाम अजून सुरू व्हावयाचा असल्याने चाऱ्याअभावी रिकामे होऊ लागले आहेत. पुढील पावसाळा सुरू होण्यास अजून अर्ध्या वर्षाहून अधिक काळ बाकी असताना शेतकऱ्यांना भेडसावू लागलेली चाराटंचाई ही चिंतेची बाब होऊन बसली आहे. (वार्ताहर)