Exclusive Interview | बाळासाहेब ठाकरे ‘अँटी मुस्लीम’पेक्षाही जास्त ‘अँटी पाकिस्तान’ होते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:30 AM2023-01-25T07:30:33+5:302023-01-25T07:35:02+5:30
महाविकास आघाडीशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही...
- राजू इनामदार
पुणे : एमआयएमपासून आमचे एकदम शिवसेनेबरोबर जाणे चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. हे दोन्ही राजकीय पक्ष आहेत. एमआयएमला मुस्लीम इंटरेस्ट होता शिवसेनेला हिंदू इंटरेस्ट आहे. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये नॅशनल म्हणजे राष्ट्रीयत्वाचा इंटरेस्टही आहे. माझ्यासाठी तोच महत्त्वाचा आहे. अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शिवसेनेबरोबरच्या युतीचे समर्थन केले. आमची युती शिवसेनेबरोबर आहे, त्यामुळे महाविकास आघाडीशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्न : शिवसेनेवर तुम्ही याआधी बरीच टीका केली आहे. तरीही त्यांच्याबरोबर युती कशी काय?
आंबेडकर : माझी टीका भारतीय जनता पक्षावर होती. शिवसेनेवर नव्हती. बाळासाहेब ठाकरे अँटी मुस्लीम असण्यापेक्षाही अँटी पाकिस्तान होते. त्यांची ती भूमिका जास्त मोठी होती. पाकिस्तानच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका असायची. माझे मत असे आहे की, दोन राष्ट्रांच्या संबंधांमध्ये धर्म ही गोष्ट येऊ शकत नाही. शिवसेनेमध्ये राष्ट्रीयत्व आहे का? तर आहे, मग आम्ही त्यांच्याबरोबर युती केली तर काय झाले?
प्रश्न : तुमची युती शिवसेनेबरोबर, शिवसेनामहाविकास आघाडीत, मग महाविकास आघाडीबरोबरचे संबंध कसे असतील?
आंबेडकर : वंचितची युती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याबरोबर आहे. त्यांची कोणाबरोबर आहे, याच्याशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही. त्यामुळे जी काही चर्चा होईल, जे काही धोरणात्मक निर्णय होतील, ते शिवसेनेबरोबर चर्चा करूनच होतील. महाविकास आघाडीबरोबर आमचा काही संबंध नाही.
प्रश्न : मग निवडणुकीचे जागा वाटप वगैरे सर्व चर्चा ही शिवसेनेबरोबरच होईल?
आंबेडकर : अर्थातच. ही सगळी चर्चा फक्त शिवसेनेबरोबर होईल. दुसऱ्या कोणाचा यात काहीही संबंध येत नाही. आम्ही बसून ठरवू सगळ्या धोरणात्मक गोष्टी.
प्रश्न : तुमच्याबरोबर आघाडी ठरल्याने शिवसेना महाविकास आघाडीबरोबर काय ठरवणार, याच्याशीही तुमचा काही संबंध नसेल?
आंबेडकर : तो शिवसेनेचा विषय आहे. त्यांच्याबरोबर कसे बोलायचे, काय बोलायचे, काय ठरवायचे याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा. महाविकास आघाडीबरोबर त्यांचा काय निर्णय होतो, काय चर्चा होते याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही.
प्रश्न : समजा तुम्हाला न पटणारी एखादी गोष्टी शिवसेनेने महाविकास आघाडीबरोबर केली तर मग?
आंबेडकर : न पटणारी गोष्ट म्हणजे काय?
प्रश्न : म्हणजे एखादी जागा तुम्ही मागितली व तीच जागा महाविकास आघाडीनेही मागितली व शिवसेनेने दिली तर?
आंबेडकर : असे होणार नाही, कारण शिवसेनेबरोबरच्या चर्चेत आम्ही आम्हाला कोणत्या जागा हव्यात ते स्पष्ट करू. त्या जागांची चर्चा झाल्यानंतर शिवसेना महाविकास आघाडीबरोबर त्या जागांचा विषय कसा काय काढेल? आमची चर्चा आधीच झालेली असणार, त्यामुळे त्या जागा शिवसेना बाजूला ठेवणार.
प्रश्न : शिवसेनेबरोबरच्या युतीचा कसा फायदा होईल, असे वाटते?
आंबेडकर : आमची युती झाल्यानंतर भाजपकडून आमच्यावर जे शाब्दिक हल्ले सुरू झाले. वंचित बहुजन आघाडीवर ते टीका करू लागले. याचा अर्थ परिणाम झाला आहे असाच होतो ना? परिणाम झाला नसता तर कशाला त्यांनी दखल घेतली असती.
प्रश्न : तुमची जी पॉकेट्स आहेत, तिथून या युतीला काही हरकत आली तर?
आंबेडकर : आमच्याच कार्यकर्त्यांची इच्छा होती अशी युती व्हावी. त्यांनीच हे ठरवले, मी फक्त जाहीर केले. त्यामुळे असा विरोध होणार नाही याची मला खात्री आहे. आम्ही एकमताने युतीचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न : ही युती मुंबई महापालिका निवडणुकीपुरतीच आहे की..?
आंबेडकर : इथून पुढे सन २०२४ पर्यंत विधानसभेसह जेवढ्या निवडणुका होतील त्या प्रत्येक निवडणुकीसाठी ही युती आहे. ती कायम असेल.