घरकामाचा बहाणा, ८ लाखांच्या ऐवजावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:56+5:302021-09-06T04:12:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घरकामाची गरज असल्याचा बहाणा करून दोन दिवस काम केल्यावर ज्येष्ठ नागरिकास पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे ...

Excuse for housework, relying on Rs 8 lakh | घरकामाचा बहाणा, ८ लाखांच्या ऐवजावर डल्ला

घरकामाचा बहाणा, ८ लाखांच्या ऐवजावर डल्ला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : घरकामाची गरज असल्याचा बहाणा करून दोन दिवस काम केल्यावर ज्येष्ठ नागरिकास पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेने ८ लाख ८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही घरकामाचा बहाणा करून एका महिलेने घरातील तिजोरीच चोरून नेली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.

ही घटना कल्याणीकरमधील इंद्रस्थ सोसायटीत घडली. याप्रकरणी एका ७३ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी या घरात एकट्याच राहतात. गेल्या आठवड्यात त्यांच्याकडे बिंदिया असे नाव सांगणारी एक महिला काम मागण्यासाठी आली. त्यांनाही घरकामासाठी मोलकरणीची गरज होती. म्हणून त्यांनी तिला कामावर ठेवून घेतले. तिच्याकडे त्यांनी आधार कार्ड मागितले. तेव्हा आणून देते, असे तिने सांगितले. दोन दिवस काम केल्यावर उद्या आधार कार्ड घेऊन येते, असे सांगितले. २९ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजता ही महिला काम करीत असताना फिर्यादी यांनी तिला पिण्यासाठी पाणी मागितले असता तिने पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध टाकून ते त्यांना पिण्यास दिले. पाणी पिल्यानंतर फिर्यादी हे बेशुद्ध झाले. त्यानंतर या महिलेने घरातील ६ लाख ९४ हजार रुपयांचे १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ लाख १० हजार रुपयांचे प्लॅटिनमचे ब्रेसलेट व ४ हजार रुपये रोख असा ८ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करीत आहेत.

-----------------------

कामावर ठेवताना माहिती घ्या

घरकाम मागण्यासाठी आलेल्या महिलेने घरात चोरी करण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे़ यापूर्वी एका ज्येष्ठ दाम्पत्याकडे एका महिलेने असेच चार दिवस काम केले व त्यानंतर लाखो रुपयांचे दागिने असलेली इलेक्ट्रॉनिक तिजोरी चोरून नेली होती. घरकामासाठी नोकर ठेवताना अगोदर यांची चौकशी करावी. त्यांचे आधार कार्ड, फोटो घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Excuse for housework, relying on Rs 8 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.