कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना पकडले

By admin | Published: April 28, 2015 11:23 PM2015-04-28T23:23:59+5:302015-04-28T23:23:59+5:30

येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ राजाराम रसाळ यांना ५० हजारांची लाच घेताना आज (दि. २८) दुपारी १२.३० च्या सुमारास लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.

The executive engineer was caught taking bribe | कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना पकडले

कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना पकडले

Next

मंचर : येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ राजाराम रसाळ यांना ५० हजारांची लाच घेताना आज (दि. २८) दुपारी १२.३० च्या सुमारास लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
याबाबत कळंब येथील विनोद विठ्ठल भालेराव (वय ३०) यांनी तक्रार दिली होती. विनोद भालेराव हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून, मंचर येथे दोन नव्याने बांधलेल्या इमारतींना फिटिंग व मीटर पुरविण्याचे त्यांनी काम घेतलेले आहे. त्यांनी सदर ठिकाणी विद्युत पुरवठा तसेच ९० मीटर मिळण्यासाठी मंचर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये फेब्रुवारी २०१५ विहित नमुन्यात अर्ज, कोटेशन व आवश्यक ती कागदपत्रे सादर करून फी भरणा केलेली आहे. सदरचे प्रकरण कार्यकारी अभियंता सिद्धार्थ रसाळ यांनी मंजूर केले आहे. मात्र प्रत्यक्ष मीटर सप्लाय देण्याच्या कामासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी सोमवारी (दि. २७) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ रसाळ लाच मागत असल्याची तक्रार नोंदवली.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज मंचर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये पंचांसमक्ष तक्रारदार विनोद भालेराव यांनी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ रसाळ यांची भेट घेतली.
लाचेबाबत बोलणी केली असता रसाळ यांना प्रथम हप्ता ५० हजार रुपये देण्याचे तडजोडीअंती ठरविण्यात आले. त्यानुसार रसाळ (वय ५१) यांना लाचेची मागणी करून ती स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. (वार्ताहर)

 

Web Title: The executive engineer was caught taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.