त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:59+5:302021-06-27T04:08:59+5:30
पुणे : कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ...
पुणे : कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. त्यात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी कोरोनामुळे पालकांचे छत्र गेलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा व ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले आहे त्यांना परत देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठातील विकास कामांबाबतचा आढावा घेण्यात आला.
विद्यापीठातील क्रीडा संकुलाचे कामकाज जुलै महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश व्यवस्थापन परिषदेकडून प्रशासनाला देण्यात आले. व्यवस्थापन परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील केवळ निम्म्याच विषयांवर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर बैठक स्थगित करण्यात आली. येत्या २ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत उर्वरित विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
----------------------------------------------