रोज आठ तासांचा व्यायाम, तेव्हा गाठले जगातले सर्वोच्च टोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:11+5:302021-05-18T04:12:11+5:30

उमेश जाधव लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोरोनामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण, बेस कॅम्पवरील तणाव असे असूनही जगातील सर्वोच्च ...

Exercise eight hours a day, reaching the highest point in the world | रोज आठ तासांचा व्यायाम, तेव्हा गाठले जगातले सर्वोच्च टोक

रोज आठ तासांचा व्यायाम, तेव्हा गाठले जगातले सर्वोच्च टोक

Next

उमेश जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “कोरोनामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण, बेस कॅम्पवरील तणाव असे असूनही जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निश्चय केला. अन्नपूर्णा मोहिमेमुळे एव्हरेस्टवर चढाई करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. प्रशिक्षण, सराव, मानसिक कणखरता, तंदुरुस्तीमुळेच एव्हरेस्टवर पाऊल ठेवण्याची स्वप्नवत कामगिरी पार पाडू शकलो,” अशी भावना एव्हरेस्टवीर जितेंद्र गवारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.

गवारे यांनी १२ मे रोजी सकाळी एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल टाकले. पण, या चढाईची सुरुवात त्याआधी सात वर्षे झाली होती. वयाच्या पस्तिशीनंतर गवारे गिर्यारोहणाकडे वळले आणि बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी एव्हरेस्ट गाठले. प्रशिक्षक, गिरिप्रेमी संस्थेचे सर्व सहकारी, ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, एव्हरेस्टवीर भूषण हर्षे आणि डॉ. समित मांदळे, कुटुंबीय यांच्यामुळेच एव्हरेस्ट मोहीम यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. गवारे यांच्या कामगिरीनंतर त्यांचे मूळ गाव कारेगाव (ता. शिरूर) येथे आनंद साजरा झाला. त्यांच्याशी साधलेला हा संवाद -

एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्याचा निर्णय कधी घेतला?

- एप्रिल महिन्यात गिरिप्रेमीच्या माऊंट अन्नपूर्णा मोहिमेत सहभागी झालो होतो. एव्हरेस्ट मोहिमेसाठी हवामानाच्या दृष्टीने सध्याचा हंगाम योग्य असल्याने उमेश झिरपे यांनी प्रोत्साहन दिले. शारीरिक तंदुरुस्ती चांगली असल्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी दिला. ‘अन्नपूर्णा’ची उंची ८०९१ मीटर आहे. या मोहिमेतील सहभागानंतर एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला.

‘एव्हरेस्ट’ची तयारी कशी केली ?

- शारीरिक तंदुरुस्ती सर्वाधिक महत्त्वाची असते. गिर्यारोहणासाठी आवश्यक कौशल्ये उत्तमरीत्या आत्मसात केलेली असतील, तर ही मोहीम सोपी ठरू शकते. ८८४८.८६ मीटर उंचीचा एव्हरेस्ट चढण्यासाठीची तयारी म्हणून मेहनत केली. आठवड्यातून दोनदा २१ किमी धावायचो. आठवड्यातून दोनवेळा सिंहगड चढत होतो. व्यायामशाळेत दररोज तीन तास व्यायाम करायचो. धावणे, गिर्यारोहण आणि व्यायामशाळेतली मेहनत या पद्धतीने दररोज किमान आठ तास व्यायाम करत होतो. शरीर थकल्यानंतर ते लवकरात लवकर पुढील चढाईसाठी सज्ज होण्याच्या सरावावर भर दिला. त्यामुळे मोहिमेनंतरचा ‘रिकव्हरी’ कालावाधी २८ तासांवरून १२ तासांवर आला.

एव्हरेस्ट मोहिमेची सुरुवात कशी झाली?

-अन्नपूर्णा शिखरावरील मोहीम पूर्ण केल्यावर पाच-सहा दिवस आराम केला. त्यानंतर एव्हरेस्ट कॅम्पवर आलो. मात्र, प्रत्यक्ष एव्हरेस्ट मोहीम सुरू होण्याआधी दररोज सराव, व्यायाम करावा लागतो. त्यानुसार दररोज सराव करत होता. चढाईसाठी पूरक हवामानाचा (वेदर विंडो) संदेश मिळेपर्यंत एव्हरेस्टच्या पायथ्याशी दररोज लहान-लहान मोहिमा सुरू असतात. एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करण्याच्या एकदिवस आधी ५७०० मीटर उंचीच्या शिखरावर गेलो होतो. ‘वेदर विंडो’ मिळाल्यानंतर सर्व थकवा सोडून मोहिमेला सुरुवात करावी लागते. त्यानुसार उमेश झिरपे यांच्याकडून अनुकूल हवामान असल्याचा निरोप मिळाल्यानंतर तातडीने चढाई सुरु केली.

मोहिमेतला सर्वाधिक आव्हानात्मक टप्पा कोणता होता?

- कांचनजुंगा, अन्नपूर्णा या आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या शिखरांवरील मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने एव्हरेस्टवर चढाई करताना आत्मविश्वास अजिबातच कमी नव्हता. पण मात्र, एव्हरेस्टवरील ‘खुंबू आईसफॉल’ हा टप्पा आव्हानात्मक होता. सतत मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असल्याने येथे कस लागतो. हे आव्हान पार केल्यानंतर पुढे गिर्यारोहण तुलनेने सोपे आहे.

कडाक्याची थंडी, वेगवान वारे यापासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, तांत्रिक साहाय्य असतेच.

मोहिमेत सर्वाधिक आनंदाचा क्षण कोणता?

-एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवण्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. मात्र, एव्हरेस्ट उतरून सुरक्षितपणे कॅम्पवर परतल्यावर सहकाऱ्यांनी केलेला जल्लोष कधीही विसरता येणार नाही. एव्हरेस्टची मोहीमच अवर्णनीय, संस्मरणीय होती.

नवोदित गिर्यारोहकांना कोणता सल्ला देणार?

- मोहिमेवर जाण्यापूर्वी सर्व आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. आहार, तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यावे लागते. गिर्यारोहणामध्ये खूप अनिश्चितता असते. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठीची कौशल्ये आत्मसात करावी लागतात.

चौकट

कोरोनामुळे ‘बेस कॅम्प’वर होता तणाव

“कोरोना महामारीमुळे एव्हरेस्टच्या ‘बेस कॅम्प’वरही रुग्ण सापडत होते. त्यामुळे कॅम्पवर खेळीमेळीऐवजी अतिशय विचित्र वातावरण होते. प्रत्येक ठिकाणी तात्पुरत्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. ‘वाय-फाय’ सुविधेमुळे पुण्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीची माहिती मिळत होती. या अनिश्चित, निराशाजनक वातावरणावर मात करून एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला आणि सहा दिवसांची मोहीम यशस्वी केली,” असे जितेंद्र गवारे यांनी सांगितले.

चौकट

दमदार चढाई, तगडा आहार

‘एव्हरेस्टच्या बेस कॅम्प’पासून चढाई सुरू केल्यानंतर सहाव्या दिवशी गवारे यांना सर्वोच्च शिखर गाठता आले. मोहिमेचा एकूण कालावधी सोळा दिवसांचा होता. तत्पूर्वी दमदार व्यायामासोबतच आहारावरही गवारे यांनी लक्ष दिले होते. एक ते दीड किलो उकडलेले चिकन, चोवीस अंडी, पौष्टिक लाडू, दूध असा त्यांचा रोजचा आहार होता.

चौकट

‘गिरीप्रेमी’चा बारावा

जितेंद्र गवारे हे गिरिप्रेमीचे बारावे ‘एव्हरेस्ट’वीर ठरले आहेत. आशिष माने हे ‘गिरिप्रेमी’चे पहिले एव्हरेस्टवीर ठरले. प्रसाद जोशी, चेतन केतकर, आनंद माळी, रुपेश खोपडे, टेकराज अधिकारी, कृष्णा ढोकले, राहुल एलंगे, सुरेंद्र जालीहाळ, भूषण हर्षे आणि गणेश मोरे यांच्यासह ‘गिरिप्रेमी’च्या एकूण बारा गिर्यारोहकांनी आजवर एव्हरेस्ट पादाक्रांत केले आहे.

Web Title: Exercise eight hours a day, reaching the highest point in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.