शारीरिक, मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यायाम आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:16+5:302021-03-06T04:10:16+5:30
पुणे : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव अजूनही असल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहेत. आरोग्य राखण्यासाठी ...
पुणे : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव अजूनही असल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहेत. आरोग्य राखण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कमी कॅलरीचा, चौरस आहार घेणं, चरबीयुक्त पदार्थ टाळणं आणि नियमित व्यायाम करणे, असे प्रतिपादन डाॅ. योगेश बोडके यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे केले.
सेंट मीरा महाविद्यालयाच्या वतीने, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डाॅ. योगेश बोडके यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने जागतिक साथीचा लोकांच्या शारीरिक आरोग्य व मनस्वास्थ्यावर विपरित परिणाम झाला आहे आणि हे आरोग्य संकट निघून गेल्यावरही येणा-या शारीरिक व मानसिक समस्यांचा सामना करण्यासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहेत, असेही डाॅ. बोडके म्हणाले.
मुलांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले तर शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागले. एकूणच सर्वांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होऊन स्नायूंची ताकद कमी होणे, अति वजन वाढणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. शरीर सक्रिय राहण्यासाठी वेगवेगळ्या फिटनेस अॅप्लिकेशनचा योग्य पद्धतीने वापर केल्यास सक्रियतेबद्दल अधिक जागरूक होऊन स्वतः चे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम रितीने सांभाळू शकतो, असे सांगून दररोज दहा हजार पावले दररोज चालले पाहिजे.’’
प्राचार्य डॉ. गुलशन गिडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या वेबिनारला जिजामाता पुरस्कार विजेत्या गुरबन्स कौर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन उपप्राचार्या सुवर्णा देवळाणकर यांनी केले तर प्रास्ताविक शा. शिक्षण संचालिका एकता जाधव यांनी केले.