कसरत... जगण्यासाठी... टिचभर पोटासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 02:13 AM2018-09-18T02:13:42+5:302018-09-18T02:14:28+5:30
दोन वेळच्या जेवणासाठी चिमुकले जिवावर उदार
राजुरी : आकाशात उंच भरारी घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपल्या स्वप्नासाठी जगत असते, तर कोणी ते पूर्ण करण्यासाठी झगडत असते. पण सोनिया लढते दोन वेळेचे अन्न मिळविण्यासाठी. शाळेत जाऊन शिकण्याच्या व स्वच्छंदीपणे बागडण्याच्या वयातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलत ती दोरीवर कसरतीचे खेळ करून पैसे मिळवत आहे.
आपले चौकोनी बिºहाड घेऊन छत्तीसगड राज्यातील विलासपूरमधील अजयकुमार नाट तरुण पोटासाठी भटकत जुन्नर तालुक्यातील बेल्ह्यापर्यंत पोहोचले. कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जास्त पैसे मिळतील, या आशेने आठवडेबाजाराच्या दिवशी हे डोंबारी कुटुंब दोरीवरचे खेळ करून प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. सोनिया अजयकुमार नाट (वय ७) दोरीवर चालण्याच्या चित्तथरारक कसरती स्वत:च्या जिवाची बाजी लावत उपस्थितांचीकरमणूक करून आपल्या कुटुंबाचा आधारवड बनली आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या कळ्यांची दखल शासन घेईल तेव्हा घेईल; परंतु आज तरी ही अबोध कलिका आपले कुटुंब जगविण्यासाठी दररोज दोरीवरच्या जीवघेण्या कसरती करीत आहे.
रस्त्याच्या कडेला सहा बांबू रोवून वीस फूट लांबीचा दोर बांधून सुमारे १० फूट उंचीच्या दोरीवरून एकावर एक तीन भांडी रचून, कधी चपला, कधी अनवाणी, तर कधी स्टीलच्या ताटावरून जीवघेण्या कसरती करीत आहे. यातूनच आई-वडील व लहानग्या बहिणीसह कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मुक्कामासाठी वर आभाळ खाली धरती अशा परिस्थितीत एक जुनी दुचाकी, चार-सहा बांबू, दोरी, चार गोधड्या असा फाटका संसार घेऊन गावोगाव भटकणाºया या बिºहाडापर्यंत विकास कसा आणि कोठून पोहोचणार, असा प्रश्न पडतो.
तिच्या कसरतीच्या खेळावरच आमचे पोट असल्याने शाळेत जाणे हा प्रकार आम्हाला माहीतच नाही, असेच भटकत भटकत व कसरतीचे खेळ करीत आम्ही वर्षातून कधीतरी एकदा गावाकडे जातो.
- अजयकुमार नाट, सोनियाचे वडील