Maharashtra Assembly Election 2024 : आज तुम्हीच नायक; म्हणूनच आपला मताधिकार बजावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:53 AM2024-11-20T08:53:23+5:302024-11-20T08:53:23+5:30

निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार वाटेल ते करतील, पण खरे नायक तुम्ही आहात. आज तुम्हीच निर्णायक आहात.

Exercise your right to vote today | Maharashtra Assembly Election 2024 : आज तुम्हीच नायक; म्हणूनच आपला मताधिकार बजावा

Maharashtra Assembly Election 2024 : आज तुम्हीच नायक; म्हणूनच आपला मताधिकार बजावा

पुणे : आपलं मत कोणत्याही उमेदवारांच्या भवितव्याचा कधीही फैसला करत नाही. तर, हा फैसला असतो तुमच्या-माझ्या भवितव्याचा! सध्या प्रश्न आहे आपल्या शहराचा! आणि सवाल आहे उद्याच्या पिढ्यांच्या भवितव्याचा.

भविष्याची स्वप्नं दाखवणारा प्रचार परवा संध्याकाळी थांबला आणि आता सगळी सूत्रे तुमच्या हातात आली आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार वाटेल ते करतील, पण खरे नायक तुम्ही आहात. आज तुम्हीच निर्णायक आहात. हा देश कोणा एकाच्या मालकीचा नाही. या देशाची अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसाची आहे. या सर्वसामान्य माणसाचं एक मत सगळं काही बदलवण्याची ताकद ठेवतं. म्हणूनच आज आपला मताधिकार बजावा.

जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचेच काय, देशाचे लक्ष आहे. सत्ताधारी पक्षासाठी आणि विरोधकांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. साधारणपणे निवडणुका एवढ्या चुरशीच्या होत नाहीत. ही निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे. प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार झाला. स्टार प्रचारकांनी इथेच तळ ठोकला होता. आणि, आज मतदान होत आहे. शेवटी अंतिम कौल तुमचाच असणार आहे. कारण खरे सत्ताधीश तुम्ही आहात.

तुमच्या भविष्यावर प्रभाव मतदानातून पडत असतो, त्यामुळे अशा वेळी केलेली एखादी चूकही नंतर महागात पडू शकते. एखादी साधी गोष्ट निवडताना आपण किती विचार करतो? असा निर्णय घेताना किती बारकावे तपासतो? इथे तर आपल्याला आमदार निवडायचा आहे. आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी. तुमचा प्रतिनिधी म्हणून, तुमच्या वतीने, तुमच्यासाठी तो तुमचे प्रश्न मांडणार आहे. तुमचे मुद्दे सभागृहात पोहोचवणार आहे. इथेच चूक झाली तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरांचा एकत्रित विचार केला तर सुमारे एक कोटी लोकसंख्या आहे. शिक्षण, संस्कृती, आयटी, उद्योग यांचे माहेर असणारी ही महानगरे. या शहरांमध्ये संधी अमाप आहेत. आणि, तेवढीच आव्हानेही आहेत. ही आव्हाने पेलता आली नाहीत, तर उद्याचा काळ कठीण असणार आहे!

उद्या ही महानगरे बकाल आणि बेताल झाली तर त्याचे खापर नेत्यांवर फोडून चालणार नाही. कारण ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही योग्य नेते का निवडले नाहीत, असे प्रश्न उद्याच्या पिढ्या विचारणार आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक तुम्हाला ‘लढवायची’ आहे. लोकप्रतिनिधी काही काळापुरते सत्तेत येतील; पण अंतिम सत्ता मतदारांची असते. तशी ती असेल तर अधिकारांसोबत जबाबदारीदेखील येते. म्हणूनच मतदान कराच.

- संजय आवटे 
संपादक

Web Title: Exercise your right to vote today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.