पिसर्वेत सापडली कालबाह्य औषधे, गोदामात मोठा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 03:30 AM2017-12-31T03:30:49+5:302017-12-31T03:31:19+5:30
पिसर्वे (ता. पुरंदर) येथील कृषी खात्याच्या गोदामात कालबाह्य शेती औषधांचा मोठा साठा आढळून आला असून ही औषधे शेतक-यांना न दिल्याचा आरोप या परिसरातील शेतक-यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
जेजुरी : पिसर्वे (ता. पुरंदर) येथील कृषी खात्याच्या गोदामात कालबाह्य शेती औषधांचा मोठा साठा आढळून आला असून ही औषधे शेतक-यांना न दिल्याचा आरोप या परिसरातील शेतक-यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
पिसर्वे येथील जुन्या बालवाडीची इमारत गेल्या १० वर्षांपासून कृषी विभागाला गोदामासाठी देण्यात आलेली आहे. याच इमारतीत कृषी विभागाचे साहित्य, औषधे आदी वस्तूंचा साठा केला जातो. ग्रामपंचायतीने कृषी विभागाच्या पिसर्वे कृषी मंडळ विभागासाठीही स्वतंत्र जागा दिली असून तेथून संपूर्ण मंडळाचे कामकाज चालते. या परिसरात फळबागांचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असल्याने कृषी विभागाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. यातच पुरंदर उपसा योजनेचे पाणी उपलब्ध झाल्याने फळबागा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. आधुनिक शेती व्यवसाय करणाºया शेतकºयांची संख्या ही या परिसरात मोठी आहे. इतर तरकारीची पिके ही वाढलेली असल्याने पुरंदरचे कृषी विभाग विविध शासकीय योजना प्राधान्याने या परिसरात राबवत असते. शासकीय योजनांतून मिळणाºया अनुदानांच्या माध्यमातून येथील शेतकºयांनी बी बियाणे, औषधे, शेती अवजारे आदींचा पुरवठा करीत असतात. मात्र योजना राबविल्या जातात त्या कागदावरच राहतात, असा आरोप या परिसरातील शेतकºयांनी केला आहे. योजनांची अनुदानेही मिळत नाहीत, अनुदानातून देण्यात येणारी कीटकनाशके, औषधेही मिळत नसल्याच्या येथील शेतकरी शिवाजी कोलते, संतोष पवार, रवींद्र वाघमारे, चंद्रकांत कोलते, आबासाहेब कोलते, गणेश कोलते आदींच्या तक्रारी आहेत.
यासंदर्भात या शेतकºयांनी शनिवारी कृषी विभागाच्या गोदामाची पाहणी केली असता तेथे त्यांना विविध जैविक, रासायनिक औषधांचा मोठा साठा आढळून आला. याबाबत कृषी विभागाच्या कर्मचाºयांनाही त्यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तरे मिळाली नाहीत.
शेतकºयांनी या संपूर्ण औषधांचे मोजमाप केले. यात फळबागांसाठी लागणाºया ७ प्रकारच्या लिक्विड औषधांचे सुमारे ९६ बॉक्स, तर पावडरचे ४ बॉक्स आढळले. ही सर्व औषधे जून २०१६, जून २०१७ पूर्वीची असल्याचे निदर्शनास आले आहे. ही सर्व औषधे शेतकºयांना दिली असती तर त्यांचा फायदा झाला असता. कृषी कर्मचारी केवळ जवळच्या व संपर्कातील शेतकºयांनाच औषधे देतात. इतरांना औषधे संपल्याचेच सांगितले जाते. आज मात्र हा साठा निदर्शनास आल्याने कृषी विभागाचे पितळ उघडे पडले आहे. साठा करून ही औषधे इतरत्र विकण्याचाच प्रयत्न असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
माहिती घेऊन कारवाई करणार
माझ्याकडे गेल्या चार महिन्यांपासून या मंडळाचा प्रभारी चार्ज आहे. या काळात या मंडळासाठी भरडधान्य व कडधान्य योजनेतून ज्वारी व हरभरा बियाणे आलेले होते. त्याचे वाटप व्यवस्थित झालेले आहे. गोदामातील औषधे ही माझ्या पूर्वीची असल्याने याबाबत आपण काहीही सांगू शकत नाही. मात्र याची माहिती घेणार आहोत.
- राजेंद्र नलावडे,
पिसर्वे मंडळाचे मंडळाधिकारी
यापूर्वीचे कृषी मंडळ अधिकारी प्रभाकर इंगळे यांच्यावर या परिसरातील शेतकºयांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले असल्याने त्यांची प्रशासकीय चौकशी सुरू असल्याचे समजते. त्यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकलेला नाही.