गौरी आगमनानिमित्त परदेशी बाहुल्यांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:18 AM2018-09-17T02:18:50+5:302018-09-17T02:19:02+5:30
पारगाव येथे सुवासिनी सर्जेराव जेधे या महिलेने गणेशोत्सव व गौरी आगमनानिमित्त घरी परदेशी बाहुल्यांचे प्रदर्शन भरवले.
केडगाव : पारगाव येथे सुवासिनी सर्जेराव जेधे या महिलेने गणेशोत्सव व गौरी आगमनानिमित्त घरी परदेशी बाहुल्यांचे प्रदर्शन भरवले. यामुळे ऐन गणेशोत्सवानिमित्त प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या बाहुल्या जपान, अमेरिका, रशिया, चीन, मंगोलिया, थायलंड, आॅस्ट्रेलिया, इंग्लड, अरबी देश, आखाती देश, दुबई, कोरिया, जपान आदी देशांतून आणलेल्या लहानमोठ्या १०० बाहुल्या प्रदर्शनासाठी मांडल्या आहेत.
या बाहुल्यांमध्ये सींगिंग डॉल, स्लिपिंग डॉल, डान्सिंग डॉल आदी लक्षवेधी बाहुल्यांचा सामावेश आहे. याशिवाय भातुकलीची पारंपरिक लहानमोठी पितळी भांडी मांडण्यात आली आहेत. स्वयंपाकाची भांडी, मेकअप सेट, बैलगाडी, कृत्रिम प्राणी, रिक्षा, जर्मनीतील वॉक्सवॅगन कंपनीचे मॉडेल ठेवण्यात आले आहे. तसेच थायलंडची छत्री, चीनचा हुक्का, आफ्रिकन जिराफ, आफ्रिकन रिक्षा खेळणी प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सुवासिनी सर्जेराव जेधे म्हणाल्या की, सदर बाहुल्यांचे यापूर्वी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात प्रदर्शन भरवण्यात आले होते.
पुणेकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पारगावकरांना भातुकली प्रदर्शनानिमित्त ग्रामीण भागाची ओळख करुन देणे तसेच बार्बी बाहुल्या प्रदर्शनातून परदेशातील बाहुल्या दाखवून तेथील वेशभूषा व केशभूषा यांची ओळख करुन देणे हा यामागचा उद्देश आहे.