राज्यमंत्री भरणे म्हणाले, 'जे मला निष्क्रीय म्हणतात, त्यांची किव करावाशी वाटते'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:16 AM2022-03-15T11:16:04+5:302022-03-15T11:37:06+5:30
भरणे म्हणाले, मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही. मात्र, त्यांनी स्वत:ला तपासावे...
बारामती : विरोधकांवर इंदापुरकरांनी अनेक वर्ष विश्वास ठेवला. मात्र, त्यांच्या नाकर्तेपणामुळे गावांना रस्ते,पाण्याची सोय नव्हती. अवर्षणग्रस्त गावांच्या वाट्याला तर वनवासच आला. या गावामध्ये सोयरिक करायला देखील कोणी तयार होत नसे, अशी या गावांची २०१२ पूर्वी गावांची स्थिती बिकट होती, अशी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( ncp dattatraya bharne) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (harshwardhan patil) यांचे नाव न घेता केली.
तालुक्यातील अकोले, लाकडी, काझड येथील १३ कोटी ६६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमीपूजन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भरणे बोलत होते. यावेळी भरणे पुुढे म्हणाले, विरोधक मतांसाठी पदरात पाडून घेण्यासाठी लाकडी-निंबोडी योजना मार्गी लावण्याचे खोटे आश्वासन दिले जात असे. मात्र, आता ही योजना आता मार्गी लागणार आहे, त्यासाठी आर्थिक तरतूद देखील केली आहे. या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील ११ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे भरणे यांनी नमुद केले.
काही जण मला निष्क्रीय म्हणतात. त्यांची किव करावाशी वाटते. माझे चारित्र हनन करण्याचा देखील प्रयत्न करतात माझी शेतजमीन, माझा व्यवसाय सर्वांनाच पूर्वीपासून माहिती आहे. मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही. मात्र, त्यांनी स्वत:ला तपासावे. लोकांना १९९५ अगोदर त्यांची काय स्थिती होती. आज काय बदल झाला आहे, हे चांगलं कळतं. वैयक्तिक पातळीवर आल्यास आमच्याकडे देखील खूप मसाला आहे. १९ वर्ष त्यांनी काम केले असते तर लोकांनी मला निवडून दिले नसते. त्यांनी काम केले नाही हे एका अर्थाने चांगले झाले. नाहीतर मला लोकांसाठी काम करता आले नसते,असा टोला देखील भरणे यांनी लगावला.
यावेळी प्रतापराव पाटील, सरपंच अजित पाटील जिल्हा परिषद सदस्या हनुमंत बंडगर , प्रतापराव पाटील, बाळासाहेब पाटील, हनुमंतराव कोकाटे, रणजितसिंह निंबाळकर, सचिन सपकळ, विक्रमसिंह निंबाळकर, शुभम निंबाळकर उपस्थित होते.
... सोलापूरमध्ये जाऊन काड्या केल्या
सोलापूरचे ५ टीएमचे पाणी आपल्याला मिळाले तर आपल्याला मत मिळणार नाही, याच भीतीने आपल्याच तालुक्यातील नेत्याने सोलापूरमध्ये जाऊन काड्या केल्या, अशी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. सोलापूरकरांची यामध्ये काही चूक नाही. सोलापूरचे पाणी आपल्याला आणायचेच नव्हते, असे देखील भरणे म्हणाले.