वेश्याव्यवसायातून परदेशी महिलेची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:54 AM2018-10-04T02:54:45+5:302018-10-04T02:55:03+5:30
बाळू बाळासाहेब सातपुते (रा. जि. परभणी, सध्या विमाननगर) असे कोठडी देण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत यांनी फिर्याद दिली.
पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल लोटस येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात उकबेकिस्तान या देशाच्या महिलेची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. याप्रकरणी एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
बाळू बाळासाहेब सातपुते (रा. जि. परभणी, सध्या विमाननगर) असे कोठडी देण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत यांनी फिर्याद दिली. सातपुते हा आपली व आपल्या साथीदारांच्या उपजीविकेसाठी वेश्यागमनातून पैसे मिळवत असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली होती. याच माहितीनंतर त्यांनी लोट्स हॉटेलमधील रूम नंबर १०५ मध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये महिलेची सुटका केली.
सातपुतेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील वामन कोळी यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यामध्ये इतर एजंटांची माहिती मिळविणे, परदेशी महिला कोठे एकत्र ठेवल्यात का? मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायचा आहे, अशा विविध बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.
कोकेन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे : विक्रीसाठी कोकेन बाळगणाऱ्या घाना देशातील एका नागरिकाला दरोडा प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अॅन्ड्र्यू पॉलसन (वय ३०, रा.गोरेगाव ईस्ट, मूळ रा. जॉन स्ट्रीट, अॅक्रा, देश घाना) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. स्टेशन परिसरातील एम. एस. इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या समोरून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडून ६ लाख ४० हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४५ लाख रुपये आहे. कोकेन त्याने पुण्यात कोणाला विक्री करण्यासाठी आणले होेते, व्हीसा आणि पासपोर्टबाबत माहिती सांगण्यास आरोपी टाळाटाळ करत असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.