चंगळवाद्यांमुळे ‘हडसर’चे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: May 6, 2017 12:01 AM2017-05-06T00:01:01+5:302017-05-06T00:01:01+5:30
महाराष्ट्रातील किल्ले आणि महाराष्ट्राबाहेरील किल्ले पाहिल्यानंतर खूप मोठा फरक दिसून येतो. महाराष्ट्राबाहेरील किल्ल्यांची घेतलेली
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : महाराष्ट्रातील किल्ले आणि महाराष्ट्राबाहेरील किल्ले पाहिल्यानंतर खूप मोठा फरक दिसून येतो. महाराष्ट्राबाहेरील किल्ल्यांची घेतलेली काळजी, केलेले दुर्गसंवर्धन हे नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे एक प्रकारचे डोंगरच आहेत आणि हे किल्ले केवळ पार्ट्या आणि फिरण्याची ठिकाणे आहेत, अशी भावना चंगळवाद्यांची होत आहे. त्यात राज्यातील किल्ल्यांविषयी शासनही उदासीन आणि निष्क्रिय असल्याने किल्ल्यांची झालेली दयनीय अवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
जुन्नर तालुक्यातील हडसर ऊर्फ पर्वतगड हा एक महत्त्वाचा किल्ला जुन्नरमध्ये आहे. समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण ४,६८७ फूट आणि कोरीव प्रवेशद्वारांनी आपले वेगळेपण जपणारा हा किल्ला आहे. शहाजी सागर (माणिकडोह धरण) ओलांडून पुढे जाऊन हडसर गाव लागते. जुन्नर ते हडसर हे अंतर साधारण १६-१७ किलोमीटर आहे. जुन्नरमधील एकूण किल्ल्यांच्या यादीतील हडसर किल्ल्याच्या अभेद्य कोरीव वाटा हे वैशिष्ट्यच मानले जाते.
किल्ले पठारावरील खोदीव धान्य कोठारे, कातळाच्या पोटात लपलेले कोरीव पायरीमार्ग, जीर्ण गडदेवीचे मंदिर आणि एक शिवमंदिर, पूर्वेकडील खिळ्याची वाट असे बांधकाम शैलीचे स्वत:चे वैशिष्ट्य जपणारा किल्ले हडसर इतिहासाविषयी खूपच अबोल आहे. कोरीव दरवाजे, पायऱ्या आणि धान्य कोठार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बालेकिल्ल्यावरील एका छोटेखानी तळ्याच्या बाजूने आपण पुढे गेल्यानंतर एक जुने शंभूचे मंदिर दिसते. हडसर किल्ल्यावरील उर्वरित अवशेष बघता, इथे इतिहास फारसा बोलत नाही, असे दिसते. उपलब्ध डोंगरकपार आणि खडकाचा खूप प्रभावीपणे केलेला वापर हीच हडसरची खासियत म्हणावी लागेल. इथे बांधकाम करण्याऐवजी डोंगर कोरून पायरीमार्ग, धान्य कोठारे इ. बनविण्यात आली आहेत.
पश्चिमेकडील बाजूने डोंगरपोटात लपलेली राजवाट पुढे बालेकिल्ल्यावर घेऊन येते. राजवाटेने मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर ढासळलेल्या देवड्या पाहायला मिळतात. पुढे असलेल्या धान्य कोठाराकडे जाणाऱ्या भुयारी रस्त्याचे छत उडाले आहे. शिवमंदिराच्या बाजूने ईशान्येकडे गेल्यानंतर खिळ्यांच्या वाटेवरील भग्नावस्थेतील देवीचे मंदिर दिसते.