विद्यमान खासदारांनी एक रुपयाचेही कामे केली नाही : आढळराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:34+5:302021-07-17T04:10:34+5:30
नारायणगाव येथील बायपासचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या वतीने १७ जुलै रोजी होणार होते. या कार्यक्रमात आढळराव पाटील यांना बोलविण्यात आले नाही. ...
नारायणगाव येथील बायपासचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या वतीने १७ जुलै रोजी होणार होते. या कार्यक्रमात आढळराव पाटील यांना बोलविण्यात आले नाही. राष्ट्रवादीच्या निमंत्रणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांच्या उपस्थित नारायणगाव बायपासचे उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे, जयसिग एरंडे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, सुरेश भोर, राजाराम बाणखेले, गुलाब पारखे, अरुण गिरे, रमेश खुडे, दिलीप डुंबरे आदी उपस्थित होते. आढळराव म्हणाले, राज्यात महाआघाडी असताना या आघाडीला हरताळ फासण्याचे काम विद्यमान खासदारांनी केले आहे. दोन वर्षांमध्ये एक रुपयाचे काम त्यांनी केलेली नाही. पिक्चरमध्ये भूमिका करावी, डायलॉग मारावा अशा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न विद्यमान खासदार करीत आहेत. त्यांनी लोकांच्या भावनांशी खेळू नये. आम्ही नारायणगाव बायपासचे उद्घाटन करू नये यासाठी जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत माऊली खंडागळे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्री तुमचे असल्यामुळे पोलिसांवर दबाव टाकून उद्घाटन कार्यक्रम न करण्यासाठी परावृत्त करण्याचा प्रयत्न करू नये, पोलिसांनी या भानगडीत पडू नये, अशा इशारा आढळराव पाटील यांनी दिला.
शरद सोनवणे म्हणाले, महाआघाडी असताना माजी खासदार आढळराव यांचे उद्घाटन कार्यक्रमात नाव नाही. असले प्रकार शिवसेना खपवून घेणार नाही. आढळराव पाटील यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विद्यमान खासदारांनी करू नये, अशी टीका त्यांनी केली.