एनडीएतून निघणारा अधिकारी सर्व आव्हानांना तोंड देण्यास सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:43+5:302021-05-29T04:10:43+5:30
पुणे : देशाची सशस्त्र दले ही नेतृत्व गुण आणि अनुशासन देणाऱ्या संस्था आहेत. देशांच्या सीमांचे रक्षण करताना सैन्य अधिकाऱ्याने ...
पुणे : देशाची सशस्त्र दले ही नेतृत्व गुण आणि अनुशासन देणाऱ्या संस्था आहेत. देशांच्या सीमांचे रक्षण करताना सैन्य अधिकाऱ्याने दृढनिश्चय, उत्साह, धैर्य आणि सभ्यतेने वागणे यासारखे अनुकरणीय नेतृत्व गुणांचे प्रदर्शन केले पाहिजे. आज युद्धाचे स्वरूप बदलत असताना प्रबोधिनीतून तयार होणारा प्रत्येक सैन्य अधिकारी हा भविष्यातील लष्करी आव्हानांना समर्थपणे तोंड देईल, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा पदवीप्रदान सोहळा शुक्रवारी हबीबुल्ला सभागृहात पार पडला. यावेळी सिक्कीम विद्यापीठाचे कुलगुरू तसेच निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेटकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. एनडीएचे प्रमुख लेन्टनंट जनरल जनरल असित मिस्त्री यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रबाेधिनीच्या २१५ विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेतील ४८, संगणकशास्त्र शाखेतील ९३ तर कला शाखेच्या ७४ विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली. तसेच मित्र देशांच्या १८ विद्यार्थ्यांनाही पदवी बहाल केली. या सोबतच नाैदलाच्या ४४ तर हवाईलाच्या ४२ विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या बी.टेक शाखेचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांनाही शेकटकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
या वर्षी कॅडेट आर. सैनी याने विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक पटकावीत राैप्यपदकाचा मानकरी ठरला. त्याला जनरल के. सुंदरजी चषकाने गाैरवण्यात आले.
कॅडेट जे. ताम्रकर याने संगणक विज्ञानशास्त्र शाखेतून प्रथम येत रजत पदकाचा मानकरी ठरला. त्याला अॅडमिरल सुरेश मेहता रोलिंग चषक प्रदान करण्यात आला.
कॅडेट व्ही. कुमार याने सोशल सायन्स विभागात प्रथम येत रौप्य पदकाचा मानकरी ठरला. त्याला एअर चीफ मार्शल एनसी सुरी चषकाने सन्मानित करण्यात आले.
बी.टेक शाखेतून कॅडेट व्ही. उपाध्याय याने प्रथम येत रजत पदक पटकावले.
चौकट
आज दीक्षांत संचलन सोहळा; नाैदल प्रमुख अॅडमिरल करंबीरसिंग लांबा प्रमुख पाहुणे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उद्या मंगळवारी खेत्रपाल मैदानावर पार पडणार आहे. नाैदल प्रमुख अॅडमिरल करंबीरसिंग लांबा विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारणार आहेत. जवळपास ३०० कॅडेसट्ची तुकडी सशस्त्र दलात समाविष्ट होणार आहे. कोरोनामुळे मोजक्याच मान्यवरांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
फोटो : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४० तुकडीच्या पदवी प्रदान साेहळ्यात करंडक प्रदान करताना सिक्कीम विद्यापीठाचे कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर.