दक्षिणेतून वेळेआधी परतलेल्या मान्सूनची देशभरातून एक्झीट; अहमदनगर गारठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 07:07 PM2017-10-25T19:07:13+5:302017-10-25T19:12:10+5:30
नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी परतल्याचे बुधवारी हवामान विभागाने जाहीर केले़. पश्चिम बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, तसेच द्वीपमहासागरातून मॉन्सूनने आज माघार घेतली़
पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी परतल्याचे बुधवारी हवामान विभागाने जाहीर केले़ गोवा, महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने काल जाहीर केले होते़
पश्चिम बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, तसेच द्वीपमहासागरातून मॉन्सूनने आज माघार घेतली़
राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीला उशिरा सुरुवात झाली असली तरी तो वेगाने परतला आहे़ महाराष्ट्र, कर्नाटकातून तो १५ आॅक्टोबरपर्यंत माघारी जात असतो़ मात्र, आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दक्षिणेतील राज्यांमध्ये तो सक्रीय असतो़ या तीन महिन्यात दक्षिणेतील राज्यांमध्ये एकूण पावसापैकी ३० टक्के पाऊस पडतो़ त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांसाठी या तीन महिन्यांतील पावसाचा स्वतंत्रपणे अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे़ हवामान विभागाच्या आजवरच्या आकडेवारीनुसार साधारणपणे १५ डिसेंबरला संपूर्ण भारत आणि द्वीपसमुहातून माघारी परततो़ श्रीलंकेत तो १ जानेवारीपर्यंत सक्रीय असतो़ पण, यंदा त्याने दक्षिणेतून वेळेआधी एक्झीट घेतली आहे़ त्यामुळे आता उत्तर भारताप्रमाणे दक्षिणेतही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे़
मॉन्सूनने एक्झीट घेतल्यानंतर उत्तर भारतातील वार्यांचा जोर वाढला असून त्यामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे़ अहमदनगर येथे सर्वात कमी किमान तापमान १२़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी आहे़ अकोला १६़५, नाशिक १३़८, उस्मानाबाद १४़९, पुणे १५़१, महाबळेश्वर १६़२, वर्धा १५़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून तेथील तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे़